'मी कसा घडलो' हीच माझ्या जडणघडणीची प्रेरणा

‘मी कसा घडलो’ हीच माझ्या जडणघडणीची प्रेरणा- रामदास फुटाणे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणेः- आचार्य अत्रे यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला प्राप्त झाली. एक व्यक्ती तिच्या आयुष्यात कलेच्या माध्यमातून किती प्रकारे व्यक्त होऊ शकते, याचे अचंबित करणारे उदाहरण म्हणजे प्र.के. अत्रे. ‘मी कसा घडलो’ मधून अत्रेंमधील तीच ऊर्मी आणि ऊर्जा घेऊन मी वाटचाल करीत राहिलो आणि तीच माझ्या जडणघडणीची प्रेरणाठरली, अशी भावना ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि विडंबनकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केली.

मराठी साहित्य, नाट्य आणि पत्रकारिता क्षेत्रात मानदंड ठरलेले आचार्य प्र.के.अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त  महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, कोहिनूर ग्रुप आणि विदिशा विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३-२०२४ या संपूर्ण वर्षभरात ‘प्रतिभेचं लेणं…’ हा वार्षिक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि विडंबनकार रामदास फुटाणे यांना आज कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ‘प्रतिभेचं लेणं…’ सन्मान प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील  प्रभू ज्ञानमंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी प्रकट मुलाखतीत फुटाणे बोलत होते.  विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी फुटाणे यांच्याशी संवाद साधला.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या प्रभारी प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना रामदास फुटाणे म्हणाले की, गावात असताना मी प्रचंड गरिबी आणि हतबलता पाहिली होती, तर मुंबईत उच्चभ्रू शाळेत शिकविण्याची संधी मला मिळाली. समाजातील हा विरोधाभास आणि विसंगती मला अस्वस्थ करीत होती. घरात काँग्रेसी विचारधारेची परंपरा असताना मला समाजवाद आणि काँग्रेसी विचारधारा दोन्ही एका टप्प्यापर्यंत आवडत असे. पुढे चित्रपट क्षेत्रात काम करू लागल्यावर भालजी पेंढराकरांकडून हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचे धडे मिळत असताना संध्याकाळी नीळू फुलेंबरोबरच्या गप्पांमधून मिळणारे लोहियावादी समाजवादी विचार अशा दुहेरी विचारचक्रातून मी जात होतो. हा प्रवास सुरू असताना माझ्यातील संवेदनशील कवी, विडंबनकार, वात्रटिकाकार समाजातील आणि राजकीय क्षेत्रातील दुटप्पीपणा टिपून व्यक्त होत होता. मला कवितेची चळवळ उभी करायची होती, त्यामुळेच मी शहरी कवींना ग्रामीण भागात, तर ग्रामीण कवींना शहरी व्यासपीठांवर आणले.

२०४७ ही जातीय आरक्षणाची सीमारेषा असावी                                                                                                                                                      सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठ्यांमधले सगळेच लोक सुबत्ता असलेले नाहीत. ते गरिब आणि वंचित देखील आहेत. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढावा आणि २०४७ ही जातीय आरक्षणाची सीमारेषा ठरवून पुढील आरक्षण हे केवळ आर्थिक निकषांवर द्यावे, असे मतही यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना फुटाणे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, एकीकडे राजकारणी मंडळींची साहित्य, कला आणि संस्कृतीशी असणारी नाळ तुटल्यामुळे त्यांची असंवेदनशीलता वाढली आहे. तर दुसरीकडे विचारधारांचे झेंडे खांद्यावरती घेतल्याखेरीज आणि कोणत्यातरी कळपात सामील झाल्याखेरीज आपले अस्तित्व टिकणार नाही, असे लेखक कवींना वाटू लागले आहे. त्यामुळे व्यवस्थेवर परखड भाष्य केले जात नाही. हे धाडस रामदास फुटाणे यांनी आजवर केले. त्यांची भाष्यकविता ही महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि समाजकारणाची श्वेतपत्रिका आहे. भाष्यकविता लिहिण्यासाठी कवीची प्रतिभा, विनोद बुद्धी,  समाजाविषयी कळकळ आणि मुख्य म्हणजे धाडस असावे लागते. विनोदाचे बोट पकडून फुटाणे यांच्या भाष्यकवितेने समाजातील ढोंगावर आणि दंभावर  प्रहार करून उद्वेग, चीड, असंतोष, अस्वस्थता आणि असहायता व्यक्त केली आहे. वरवर विनोदी वाटणाऱ्या त्यांच्या भाष्यकवितांचा आशय खूप गंभीर आहे.

कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या प्रभारी प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी केले. विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी  ‘प्रतिभेचं लेणं…’ हा वार्षिक महोत्सव आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर  विदिशा विचार मंचचे समन्वयक नितीन जळुकर यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *