पुणे- घर खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील सरकार यांनी केलेल्या विविध उपायांचा चांगला परिणाम जानेवारी – मार्च २०२१ च्या पहिल्या तिमाहीत दिसून आला आणि या तिमाहीत भारतातील आठ प्रमुख शहरांत घरांची विक्री ऑक्टोबर-डिसेंबर २०२० या तिमाहीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली असे प्रॉप टायगर या मालमत्ता व्यवहार सल्लागार कंपनीच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या रिअल इन्साइट या अहवालात म्हटले आहे की जानेवारी – मार्च या काळात ६६१७६ घरांची विक्री झाली. या काळात महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांत घर खरेदी करण्याकरिता ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्क आणि सर्कल रेट मध्ये सवलत असे उपाय योजण्यात आले होते.
आता अर्थव्यवस्था धीम्या गतीने पूर्वपदावर येत आहे आणि जागतिक रेटिंग संस्था भारताच्या २०२१ आणि २०२२ मधील विकासाच्या गतीचे अनुमान सुधारत आहेत. अशा वेळी निवासी जागांसाठीची मागणी केंद्र सरकार, विविध राज्यांमधील सरकार, रिझर्व्ह बँक आणि पूर्ण बँकिंग क्षेत्र यांनी योजलेल्या विविध उपायांमुळे पुन्हा वाढीला लागली आहे. विविध क्षेत्रांत पुन्हा रोजगार उपलब्ध होऊ लागल्यामुळे घरांची मागणीही स्थिर झाली आणि गेल्या अनेक वर्षात नव्हत्या एवढ्या परवडणा -या किमतींना घरे उपलब्ध झाल्याचा फायदा घ्यायला ग्राहक तयार होत आहेत, असे प्रतिपादन हाऊसिंग डॉट कॉम, मकान डॉट कॉम आणि प्रॉप टायगर डॉट कॉम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव आगरवाल यांनी केले.
पुरवठ्याची बाजू पाहता एकूण ५३०३७ घरे देशभरात या तीन महिन्यात सादर झाली. ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत ४९ टक्के होती. याच तिमाहीत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात पायाभूत सोयींचा विकास करण्यासाठी २०,००० कोटी रुपयांचे भांडवल देऊन विकास वित्त संस्था स्थापन करण्यासाठीचे विधेयक संमत केले. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत (ऑक्टो.-डिसें. २०२०) या तिमाहीत २ टक्के कमी घरे सादर झाली.
महाराष्ट्र सरकारचा मुद्रांक शुल्क काही काळ कमी करण्याचा निर्णय मुंबई आणि पुण्यात घरांच्या विक्रीत झालेली मोठी घट रोखण्यात साह्यभूत झाला. देशांत विक्रीअभावी पडून राहिलेल्या घरांपैकी मोठ्या प्रमाणावर या दोन शहरांमधील आहेत. मुद्रांक शुल्कातील सवलत राज्य सरकारने चालू ठेवायला हवी होती कारण त्यामुळे किमती कमी होऊन घर विक्रीला उठाव आला असता. अशी आमची अपेक्षा आहे,” असे हाऊसिंग डॉट कॉम, मकान डॉट कॉम आणि प्रॉप टायगर डॉट कॉम समूहाचे मुख्य व्यवसाय अधिकारी मणि रंगराजन म्हणाले.
जवळजवळ सर्वच बँकांनी ग्राहकांचा हुरूप वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणून गृहकर्जंवरील व्याजाचे दर ६.९ टक्के एवढे कमी पातळीवर आणले आहेत. हे व्याजदर असेच कमी राहतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी येण्याच्या प्रक्रियेत सहाय्यभूत ठरतील, अशी आम्हाला आशा आहे, असेही रंगराजन यांनी सांगितले.