मुसळधार पावसाने पुण्यातील जनजीवन विस्कळीत : सिंहगड रोडच्या अनेक सोसायट्या जलमय

मुसळधार पावसाने पुण्यातील जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसाने पुण्यातील जनजीवन विस्कळीत

पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्हा आणि शहराला बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने अक्षरश: झोडपले आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार साखळी धरणाच्या क्षेत्रात झालेल्या पावसाने खडकवासला धरण भरल्याने सुमारे 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. दरम्यान, मुठा नदीच्या पाण्याची पातळी एकदम वाढल्याने सिंहगड परिसरातील नदीकाठच्या अनेक सोसायटया पाण्याखाली गेल्या आहे. पुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरलं आहे.

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील ५ सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरले . त्यामुळे घरातील सर्व सामान पाण्याखाली गेलं आहे. घरात पाणी शिरल्याने गाद्या भिजल्या आहेत, तर अनेक सामान पाण्यासोबत वाहून गेलं आहे. नागरिकांना रेस्क्यू बोटीने सुखरुप घरातून बाहेर काढण्यात आले.

अधिक वाचा  एमआयटी एडीटी विद्यापीठात 'टॅलेंट फ्यूजन' उत्साहात

 

 

पूर्वकल्पना न देता धरणातून पाणी सोडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

दरम्यान, मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून  सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला, यामुळे मुठा नदी पात्र देखील दुथडी भरून वाहात आहे.  कोणतीही पूर्वकल्पना न देता धरणातून पाणी सोडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. तर पुणे शहराच्या सखल भागात प्रचंड पाणी साचलं आहे. सोसायट्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलं आहे. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असं आवाहन पुणे प्रशासनाने केलं आहे.

मुसळधार पावसामुळे पुण्याची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. लोकांच्या घरात पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झालं आहे. घरातील जीवनोपयोगी वस्तू, खाटा, सिलेंडर पाण्यात वाहून गेले आहेत. अनेक जण स्वत:चा जीव मुठीत धरुन घरांच्या खिडकीत बसले आहेत. परिसरातील नागरीक घाबरले असून एकच तारांबळ उडाली आहे. दोराच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढलं जात आहे. फक्त मौल्यवान वस्तू हातात घेऊन लोक घरातून निघाले आहेत. अनेक लोक सोसायटीच्या टेरेसवर जाऊन बसले आहेत. बचावासाठी ते देखील लोकांना पाचारण करत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love