‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- इंग्रजांच्या काळापासून भारतातील शेतकर्‍यांनी केलेला संघर्ष आणि आजची सद्यःस्थिती यावर प्रकाश टाकणारे ‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.  रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक  नाना जाधव आणि प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव  यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पुस्तक प्रकाशन झाले. हे पुस्तक ‘भारतीय किसान संघा’चे महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री चंदन पाटील यांनी लिहिले असून  आनंद कृषी विश्वविद्यालयाचे प्रथम कुलगुरू डॉ.मदनगोपालचंद्र वार्ष्णेय यांची  प्रस्तावना  आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून भारतात शेतकरी आंदोलन चर्चेत आहे. साधारणपणे आजकाल कोणत्याही मुद्द्यावर ‘सोशल मीडिया’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’त दोन गट पडतात. दोन्ही गट संबंधित विषयावर सखोल चर्चेऐवजी राजकीय चिखलफेक आणि उथळ चर्चा करण्यातच धन्यता मानतात. किंबहुना, आपले निहित स्वार्थ साधण्यासाठी आंदोलकांतील काही घटकांनादेखील हेच अपेक्षित असते. शेतकरी आंदोलनही यातून सुटले नाही. उत्तर भारताच्या काही राज्यांतील शेतकर्‍यांनी केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कायदे शेतकरीविरोधी आहेत, म्हणून ते सरळ मागे घेण्यात यावे, अशी भूमिका घेतली. या मागणीसाठी हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले. या दरम्यानच्या कालावधीत सरकारबरोबर त्यांच्या चर्चेच्या फेर्‍यादेखील सुरू होत्या.  या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या २०० वर्षात  भारतातील शेतकर्‍यांनी केलेला संघर्ष आणि आजची सद्यःस्थिती यावर प्रकाश टाकणारे आणि वास्तव दर्शविणारे हे पुस्तक आहे.

 यावेळी  डॉ. प्रवीण दबडघाव यांनी आपले विचार मांडले. हे पुस्तक अधिकाधिक  कार्यकर्ते, शेतकरी व समाजातील प्रभावी लोकांपर्यंत पोहोचवावे. कारण शेतकरी या देशातील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या समस्या व संघर्ष याबाबत किसान संघ कार्यरत आहेच. परंतु  उपलब्ध  माहिती सगळी कडे पोहोचणे आवश्यक आहे. असे सांगून  सर्वांना शेतकरी समस्या व त्यासाठी सुरू असलेला संघर्ष  याबाबत जाणीव जागृती होऊन उपाय योजना करण्यासाठी सक्रिय होण्यास मदत होईल. राष्ट्रहित सर्वोपरी चा विचार करून पुस्तकाची मांडणी वेगळ्या धाटणीने केली आहे,असेही ते म्हणाले.

यावेळी  सह संपर्क प्रमुख  मिलिंद देशपांडे, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह  विवेक जोशी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *