‘हॅण्ड ऑफ गॉड’ दियोगो माराडोना:वाचा एकान महान फूटबॉलपटूचा संपूर्ण प्रवास

क्रीडा
Spread the love

अर्जेंटिना कडून चार विश्वचषक स्पर्धा खेळलेला,एक विश्वचषक जिंकून देणारा, पेलेनंतर जागतिक पातळीवर सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेला,सर्वात पहिला विक्रमी ट्रान्स्फर फी देऊन व्यवसायिक क्लब पातळीवर करार करून घेतलेला खेळाडू,अद्वितीय,अफलातून खेळामुळे देवपण देऊन  ज्याच्या नावाने चर्च बांधले गेले व मूर्ती पूजन केले गेले,2002 मध्ये फिफा च्या सर्वे मधील 20 व्या शतकातील सर्वात उत्कृष्ट गोल ज्याच्या नावावर नोंद आहे,तसेच 20 व्या शतकातील “फिफा प्लेअर ऑफ द 20 सेंच्युरी”पुरस्कार पटकावणारा महान खेळाडू म्हणजेच ‘हॅण्ड ऑफ गॉड’ दियोगो माराडोना यांचे  वयाच्या 60 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.संपूर्ण फुटबॉल जगत यामुळे हादरून गेले.त्यांच्या कायम चर्चेत राहिलेल्या फुटबॉल प्रवासाची ही धावती ओळख….

30 ऑक्टोंबर 1960 रोजी लानुस, अर्जेंटिना मध्ये जन्मलेला दियोगो माराडोनाची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. लहानपणापासूनच फुटबॉल विषयी प्रेम होते. रस्त्यावरील फुटबॉल खेळत खेळत त्याने आपले कौशल्य विकसित केले.स्थानिक स्पर्धांतून खेळत नावलौकिक मिळवला.आणि एक दिवशी त्याचे हे कौशल्य पाहून त्याला 1976 साली अर्जेंटिना जूनिअर्स या प्रसिध्द व्यवसायिक संघात घेतले गेले.सर्वात युवा खेळाडू म्हणून तो संघात होता.वय 16 वर्षे होते म्हणून त्याला 16 नंबरची जर्शी देऊन एका सामन्यात खेळण्याची संधी दिली.याचे सोने करत माराडोना ने आपली पायातील जादू सर्वांना दाखवली.1978 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम संघात त्याला कमी वय असलेने प्रशिक्षकांनी घेतले नाही.त्या वर्षी अर्जेंटिना विश्वविजेता झाला.दियोगोची संधी हुकली.पण 1979 सालच्या 20 वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची अर्जेंटिनाच्या 20 वर्षाखालील संघात निवड झाली.आणि या स्पर्धेत  त्याने आपला करिष्मा दाखवला.अंतिम सामन्यात सोव्हिएत युनियन संघाचा 3-1 असा पराभव करून संघास विजेतेपद मिळवून दिले.यात महत्वपूर्ण गोल त्याने केला.त्याचा खेळ फिफाच्या सर्व तज्ज्ञ समितीच्या मनात भरला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गोल्डन बॉल देऊन त्याचा गौरव करण्यात आला.त्याची लोकप्रियता वाढली. अर्जेंटिना जूनिअर्स कडून परत जोमाने खेळत अनेक स्पर्धा जिंकून दिल्या. या संघाकडून पाच वर्ष खेळत त्याने 167 सामन्यात 116 गोल केले.त्याचा खेळ व कामगिरी पाहून अनेक संघ त्याला घेण्यास पुढे आले.1981 साली अर्जेंटिना मधील प्रसिध्द बोका जूनिअर्स संघाने 4 मिलियन डॉलर्स इतकी मोठी रक्कम देऊन त्याला घेतले.संघातील सर्वात महागडा खेळाडू तो ठरला.संघात आल्यावर त्याने संघास अर्जेंटिना डोमेस्टिक लीगचे टायटल जिंकून दिले.तसेच प्रतिष्ठेच्या मेट्रोपोलीटेनो स्पर्धेचे विजतेपद जिंकून देताना सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.सामना झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले आणि मैदानातून फिरवले. हे संघाचे सर्वात यशस्वी वर्ष होते.त्याची आक्रमकता पाहून 1982 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड केली गेली.पहिलाच विश्वचषक तो खेळणार होता.स्पेन मध्ये झालेल्या या स्पर्धेत अर्जेंटिनाचा सर्व संघ युवा असलेने चांगली कामगिरी करता आली नाही.पण माराडोनाची कामगिरी विशेष लक्ष वेधून घेत होती. दुसऱ्या फेरीत अर्जेंटिना स्पर्धेबाहेर पडला.पण माराडोनाला बार्सिलोना संघाने मार्क केले.

1982 साली विक्रमी 5 मिलियन डॉलर्सचा करार करून तो बार्सिलोना संघात तीन वर्षासाठी दाखल झाला. संघात आल्यावर स्पेनची प्रसिध्द कोपा डेल रे स्पर्धा रियल माद्रिद संघास नमवून जिंकून देण्यात मोलाची कामगिरी त्याने बजावली.तसेच स्पॅनिश कप स्पर्धा अटलाटिको बिलबाऊ एफसी ला नमवून जिंकून दिली.त्याची कामगिरी अनेक संघांना आकर्षित करत होती.पण विरूध्द संघाच्या खेळाडूंना डोकेदुखी ठरत होती.कारण त्याला अडवणे म्हणजे मोठी कसरतच करावी लागत होती.साडेपाच फूट उंचीचा हा खेळाडू वेगवान ड्रिबलींग,अप्रतिम बॉल कंट्रोल मुळे सापडत नसे त्यामुळे अक्षरशः मारहाण करून त्याला अडवावे लागत होते.1984 साली त्याची प्रचिती आली ती कोपा डेल रे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, माराडोनाचा हा बार्सिलोना सोबत शेवटचा हंगाम होता.आणि शेवटचा सामना.त्यामुळे तो आपले सर्वस्व पणाला लावून खेळत होता. अटलेटिको बिलबाऊ एफसी विरुद्धच्या या सामन्यात त्याला बिलबाउच्या खेळाडूंनी सुरवातीपासून मारण्यास सुरुवात केली होती.10 ते 15 वेळा तो मैदानावर पडला असेल, पण तो शेवट पर्यंत ते सहन करत होता. बिलबाऊ संघाने हा सामना 1-0 ने जिंकला. पण संघातील काही अतिउत्साही खेळाडूंनी जाणून बुजून माराडोनाला टार्गेट करून मारहाण करण्यास सुरवात केली. हे पाहून बार्सिलोनाचे खेळाडू त्याच्या मदतीला धावून आले.आणि मैदानात अक्षरशः युद्ध सुरू झाले.मारहाणीत माराडोनाचा टी शर्ट फाटला गेला.त्याला प्रोटेक्शन दिले गेले.बार्सिलोना मधील शेवट वाईट झाला.

 नापोली संघाने 1984 साली विक्रमी करार करून त्याला करारबद्ध केले.आणि या आक्रमक मिडफिल्डरला 5 जुलै 1985 रोजी पाहण्यासाठी 75,000 हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली.त्याकाळी शाळा,कॉलेज,स्टेशन,घरात सर्वत्र त्याची चर्चा सुरू होती.तेव्हा तेथे उत्तर इटली व दक्षिण इटली असा भेद चालू होता.म्हणजे उत्तर इटलीत एसी मिलान, इंटर मिलान, जुवेंटस सारखे दिग्गज संघ आपली फुटबॉल मध्ये मक्तेदारी राखून होते.तेव्हा दक्षिण इटलीत नापोली संघ नुकताच जम धरत होता.दिग्गज संघ तेथे नव्हते.या परिस्थितीत त्याने तिथे पाऊल ठेवले होते. दोन वर्षे या संघाला त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून दिले.या यशाबरोबरच त्याची लोकप्रियताही वाढत होती.त्याची कामगिरी पाहून 1986 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार पदी नियुक्त केले.ही स्पर्धा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णक्षण होती.

  1986 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत माराडोनाला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली.विशेषतः इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात,या स्पर्धेत अर्जेंटिना सुरवातीपासून दर्जेदार कामगिरी करत क्वार्टर फायनलमध्ये आला होता.इंग्लंड ही सरस संघ होता. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड व अर्जेंटिना समोरासमोर आले.आणि एक ऐतिहासिक नोंद ठेवण्यासाठीच दोन्ही संघ सज्ज झाले.सामना जिंकावा म्हणून सर्व अर्जेंटिना देशातील जनता एक होऊन या विजयासाठी प्रार्थना करू लागले.कारण ही तसेच होते.1982 चा तो काळ असा होता की,युद्धजन्य परिस्थिती अर्जेंटिना मध्ये झाली होती.1920 मध्ये अटलांटिक महासागरातील फालकलँड् हे बेट अर्जेंटिनाने स्पेनच्या जाचातून मुक्त केले.व तेथे अर्जेंटिनाच्या लष्कराचे सामर्थ्य प्रस्थापित केले.पण जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडला ही गोष्ट समजताच त्यांनी 1982 ला सर्व शक्तिनिशी अर्जेंटिनाच्या लष्करावर हमला केला. 74 दिवस हे युद्ध सुरू होते.अर्जेंटिनाचे अनेक सैन्य या युद्धात मरण पावले.अर्जेंटिनाचा पराभव झाला.अर्जेंटिना मधे इंग्लंडचा द्वेष सुरू झाला.याचा बदला घ्यावा असे सर्वांना वाटू लागले.इंग्लंडने ते बेट काबीज केले पण अर्जेंटिना बदल्याने खदखदत होता.या युद्धाची झालर 1986 च्या  विश्वचषकातील या सामन्याला आली होती.सहज विचार केला तर समजेल भारत पाकिस्तान सामना म्हटला की भारतात कशी परिस्तिथी असते.सेम हीच स्थिती येथे होती.सामना सुरू होण्याआधीच दोन्ही देशांचे प्रेक्षक एकमेकांत भांडणे करत होते.सामना सुरू झाला आणि अर्जेंटिनाच्या या कर्णधाराने आपल्या सर्वांग सुंदर अशा खेळाने पूर्ण मैदानाला आग लावली. गोलपोस्टवर अनेक आक्रमणे त्याने केली.याच सामन्यात त्याने अजूनही प्रसिध्द असलेला हॅण्ड ऑफ गॉड हा किताब ज्या गोलने दिला तो हाताने नोंदवलेला गोल केला.पंचाना काहीच समजले नाही.गोल होण्याचा इशारा दिल्यावर स्टेडियम मधून माराडोनाचा जयजयकार ऐकू येऊ लागला.इंग्लंड संघ दबावाखाली गेला. माराडोनाला इंग्लंड संघाने जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला पण 19 व्या शतकातील सर्वात उत्कृष्ट गोल म्हणून 2002 मधे ज्या गोलची फिफाने नोंद घेतली.तो गोल माराडोनाने नोंदवला.सेंटर लाईन पासून पाच खेळाडू व गोलकिपरला चकवून त्याने संघाचा व आपला दुसरा गोल नोंदवला आणि अर्जेंटिनाचा  विजय निच्छित केला.सामना संपण्याची शिट्टी वाजताच प्रेक्षकांनी त्याच्या नावाच्या जयघोषाने स्टेडियम दणाणून सोडले.या जागतिक कीर्तीच्या गोलमुळे व इंग्लंड वरील महत्वाच्या विजयामुळे माराडोनाला देवपण दिले गेले.सेमी फायनल मध्ये बेल्जियम विरूध्द आणखी दोन गोल त्याने करत संघाला अंतिम फेरीत आणले.अंतिम सामन्यात त्याला जखडून ठेवण्याचा प्रयत्न जर्मनीने केला.पण त्याने केलेल्या झुंजार खेळीने जर्मनीचा 3-2 ने पराभव झाला. अर्जेंटिना संघाने विश्वचषक उंचावला. सुवर्ण कामगिरी बद्दल माराडोनाला गोल्डन बॉल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.20 वर्षाखालील युवा व वरिष्ठ फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल जिंकणारा तो पहिलाच खेळाडू होता.अता अर्जेंटिनाचाच लिओनेल मेस्सी दुसरा खेळाडू ठरला आहे. स्पर्धेनंतर अर्जेंटिना मध्ये माराडोनाला दैवत्व देण्यात आले.त्याचे नाव दियोगो त्यातील पहिले अक्षर D व त्याची जर्शी 10 नंबरची हे एकत्रित जोडून (D10S) असे डायोस(Dios)म्हणून त्याला संबोधण्यात येऊ लागले. डायोस म्हणजे देव.30 ऑक्टोबर 1987 ला त्याच्या वाढदिवसानिमित्त माराडोनियन नावाने चर्च उभारण्यात आले. स्लोवाकिया मधे तर त्याच्या 22 जून 1986 रोजी इंग्लंड वर नोंदवलेल्या गोलचे स्मरण कायम करण्यात यावे म्हणून चर्च मधे प्रस्ताव केला गेला.त्याची लहान मूर्ती लोक पूजनात ठेवू लागले.यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते.

 विश्वचषक स्पर्धेनंतर माराडोना परत इटलीत खेळण्यासाठी आला.त्याच्या आगमनाने नापोली संघात एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती. विश्वविजेत्या संघाचा कर्णधार आल्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना एक प्रकारचे बूस्ट मिळाले होते.नापोली संघाची यशस्वी कारकीर्द सुरू झाली होती. माराडोनाने त्याच्या आक्रमक खेळीने पहिल्यांदाच इटलीतील प्रतिष्ठेच्या सीरिया ए 1986 लीगचे  विजेतेपद नापोली संघास जिंकून दिले.या विजयाने नापोली शहरात सर्वत्र दिवाळी साजरी झाली.लोक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत होते. मोठाल्या इमारतींवर माराडोनाचे भव्य पेंटिंग्ज काडले जात होते.आणि लिहले जात होते “डाऊन नॉर्थ एम्पायर, बॉर्न साऊथ एम्पायर”.त्यावेळी त्या नावाची इतकी क्रेझ निर्माण झाली होती की नवीन जन्म घेतलेल्या लहान मुलांना दियोगो हे नाव देण्यात येत होते. अनेक स्पॉन्सर नापोलीच्या मदतीसाठी पुढे आले.संघाची आर्थिक स्थिती सुधारू लागली. 1987 मधे कोपा इटालियन,सुपर कोपा असे अनेक चषक जिंकले.तसेच सीरिया ए दुसऱ्यांदा जिंकली.1989 साली फुटबॉल जगतातील सर्वोच्च युएफा कप नापोली संघास जिंकून देण्यात त्याने महत्वाची कामगिरी बजावली.यामुळे तो लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहचला. पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचा कर्णधार म्हणून त्याची जबाबदारी वाढली.

1990 सालची विश्वचषक स्पर्धा इटली मध्ये झाली.सुरवातीपासून गतविजेता अर्जेंटिना संघ दमदार कामगिरी करत सेमी फायनल मधे दाखल झाला होता.येथे यजमान इटलीसोबत सामना होता.पण इटलीतील नापोली संघाचे समर्थक माराडोनालाही समर्थन करत होते.पूर्णवेळ सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.आणि ट्रायब्रेकवर 4-3 असा अर्जेंटिनाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.तिकडे जर्मनीने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 1982,86आणि 1990 सलग तीन विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत खेळणारा जर्मनी पहिलाच संघ ठरला होता. तर माराडोनाचा अर्जेंटिना संघ सलग दुसरा विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज होता.हा सामना पूर्णपणे रोमहर्षक झाला पण अर्जेंटिनाच्या बचावफळीतील चुकीमुळे जर्मनीला पेनल्ट्टी किक दिली गेली.यावर गोल करून जर्मनीने अर्जेंटिना वर दबाव निर्माण केला. नंतर अर्जेंटिनाच्या दोन खेळाडूंना नियमबाह्यपद्धतीने खेळ केल्यामुळे रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे 9 खेळाडूंवर अर्जेंटिना खेळत होता.अखेर जर्मनी संघाने 1-0 ने हा सामना जिंकून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.

स्पर्धेनंतर नापोलीकडून तो खेळू लागला.पण येथून त्याचा वाईट वेळ सुरू झाला तो 1991 साली,त्याच्यावर ड्रग्स (कोकिन)प्रकरणामुळे 15  महीने बंदी घातली गेली.फुटबॉल वर्तुळात हे पहिल्यांदाच घडले होते. प्रचंड टीका त्याच्यावर होऊ लागली.पण त्याचा खेळ त्याकाळी भुरळ घालणारा होता.1992 साली स्पेन मधील प्रसिध्द सेव्विला एफसीने पुढे येत त्याला करार बद्द केले.एक वर्षे येथून तो खेळला.नंतर अर्जेंटिना मधीलच नेवेल्स ओल्ड बॉईज मध्ये एक वर्षे खेळला. यानंतर पुढच्याच वर्षी अमेरिकेत होणाऱ्या 1994 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची अर्जेंटिनाच्या संघात निवड करणे गरजेचे होते.कारण तो संघाचा प्लेमेकर होता.त्याचा समावेश केला गेला.

1994 साली अमेरिका मधे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन सामने तो खेळला असेल.ग्रीस विरूद्ध गोल नोंदवून कॅमेऱ्यासमोर त्याने केलेले गोल सेलिब्रेशन चर्चेत होते. तोच त्याला डोपिंग टेस्ट मधे दोषी धरले आणि घरी पाटवले गेले.फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच हा प्रकार घडला होता.आणि दिग्गज खेळाडू बाबतीत यामुळे संपूर्ण फुटबॉल विश्व हादरून गेले होते. लगेचच 18 महीने त्याच्यावर बंदी घातली गेली. ग्रीस विरूध्द त्याने केलेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेवटचा गोल तसेच अर्जेंटिना कडून खेळलेला त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

डोप प्रकरणामुळे त्याला घेण्यासाठी कोणताच संघ पुढे येईना.त्यामुळे तो त्याचा पहिला जुना क्लब बोका जूनिअर्स मधे दोन वर्षे खेळला.आणि 1997 साली त्याने फुटबॉल क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती नंतर त्याने अनेक संघांना मार्गदर्शन केले.2010 साली अर्जेंटिना संघाचा तो प्रशिक्षक होता.प्रशिक्षक म्हणून त्याची कारकीर्द यशस्वी झाली नाही.पण एक खेळाडू म्हणून त्याची लोकप्रियता अजूनही तितकीच अखंडपणे सुरू आहे.याचे एक उदाहरण म्हणजे 2008 साली भारतामधे तो कलकत्यातील एका फुटबॉल अकादमीच्या उद्धघाटनाला आला होता.तेव्हा त्याला पाहण्यासाठी साल्ट लेक मैदानावर एक लाख प्रेक्षक उपस्थित होते.त्यावेळी अकॅडमीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या पायाचा ठसा उमटवून एक साचा तयार करून तो तेथे ठेवण्यात आला होता.अजूनही तो त्यांच्या संग्रही आहे. हे फक्त एक उदाहरण झाले असे तो जेथे जातो तेथे फुटबॉल प्रेमी त्याला भरभरून प्रेम देतात.2004 साली अर्जेंटिना मधील एका पब्लिकेशन संस्थेने त्याचे आत्मचरित्र पुस्तक रुपात प्रसिध्द केले. ते विक्रमी संख्येने विकेले गेले.सध्या तो वर्षांचा असून अर्जेंटिना मधील प्रसिध्द क्लब दी जीमनाशिया एसग्रिमा ला प्लाटा एफसी चा मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू सर्जिओ एग्वेरो त्याचा जावई आहे.अख्ख्या जगाला आपल्या खेळाने वेड लावलेल्या व फुटबॉल मधील चांगले वाईट अनुभव जगलेल्या या महान फुटबॉल खेळाडूने आज फुटबॉल जगतास पोरखे करून जगातूनच निवृत्ती घेतली.फुटबॉल क्षेत्रास त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना.💐⚽🇦🇷♥️🇦🇷⚽⚽

      (अनिल अडसुळे)                                                   

 जुना बुधवार पेठ,कोल्हापूर

मो.9096006656,9834094159

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *