# Shriram Temple : स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – २ : वैदिक व पौराणिक कालखंडातील अयोध्या

Ram Janmabhoomi
Ram Janmabhoomi

Fulfillment of the dream of grand Ram Mandir construction : हिंदू समाजाची जी काही मानचिन्हे व श्रद्धास्थाने आहेत, त्यामध्ये अयोध्या अग्रभागी आहे. एका जुन्या श्लोकामध्ये भारतातील वेगवेगळ्या तीर्थस्थानांचा उल्लेख करत असताना अयोध्या नगरी म्हणजे विष्णूचे मस्तक असल्याचे म्हटले आहे. भारत हा सोळा महाजनपदांपासून तयार झाल्याचे वैदिक ग्रंथात नमूद केले आहे. शरयू नदीच्या आधाराने वसलेले एक महाजनपद कोसल व कोसल या जनपदाची राजधानी म्हणजे अयोध्या!

कवी कालिदासांच्या काव्यात देखील अयोध्या नगरीचे वर्णन आहे. वैवस्वत मनूचा पुत्र इक्ष्वाकू याने अयोध्या नगरीची स्थापना केल्याचे वैदिक ग्रंथांमधून लक्षात येते. अयोध्येच्या स्थापनेनंतरच सूर्यवंश सुरू झाल्याचे मानले जाते. वाल्मिकी रामायणापूर्वीपासूनच अयोध्येचे उल्लेख सापडतात. शरयू ही भारतातील सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक महत्त्वाची नदी असल्याचा उल्लेख ऋग्वेदात सापडतो. मत्स्य व ब्रह्मांड पुराणात देखील अयोध्या नगरी व शरयू नदीचे उल्लेख आलेले आहेत. अथर्ववेदामध्ये अयोध्येचे वर्णन करताना म्हटले आहे, की आठ वर्तुळांमध्ये वसलेली आणि नऊ द्वारे असलेली ही अयोध्या नगरी साक्षात देवांची नगरी आहे. तिच्या कोशागारातील सोन्याचा खजिना जणू प्रकाशमान स्वर्गच आहे. तर तैतिरिय अरण्यक, बृहदारण्यक अशा ग्रंथांमध्ये अयोध्येचा उल्लेख अपराजिता असा केला गेला आहे.

अधिक वाचा  मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्याचा कदाचित परिणाम म्हणून हे सगळं घडत असावं

पौराणिक ग्रंथांमध्ये देखील अयोध्या नगरीचा उल्लेख सापडतो. ब्राह्मण ग्रंथात विशेषत: ऐतरेय ब्राह्मण्यग्रंथात अयोध्येचा उल्लेख सापडतो. महाभारतातील वनपर्वात अयोध्या नगरीचे वर्णन आले आहे. स्कंद, ब्रह्मांड, बृहद्धर्मोत्तर, वायू, विष्णू, ब्रह्म, पदम अशा पुराणांमध्ये भारतातील महत्त्वाचे आणि पुण्यप्रद नगर म्हणून अयोध्येचा उल्लेख सापडतो. स्कंद पुराणामधील विष्णू अथवा वैष्णव खंडात अयोध्या महात्म्य वर्णिले आहे.

सन १०५२ पूर्वी लिहिलेल्या ‘रुदयामल’ या ग्रंथात अयोध्येचे महत्त्व सांगत असतानाच अयोध्येत ज्या स्थानी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, त्या ठिकाणी मंदिर असल्याचा व तेथे संपूर्ण भारतभरातून भक्तगण दर्शनासाठी येत असल्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राचा जन्म ज्या ठिकाणी झाला, तेथे मंदिर कोणी बांधले असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लोमष रामायणाचा आधार घेताना असे लक्षात, की प्रभू रामचंद्राचा पुत्र कुश याने अयोध्या नगरीचा जीर्णोद्धार करून राम जन्मस्थानावर भव्य मंदिर बांधले. भगवान महावीर व गौतम बुद्ध हे महापुरुष देखील अयोध्या नगरीत अनेक वर्षे राहिल्याचे व तेथे राहून त्यांनी आपल्या विचारांच्या प्रसाराचे कार्य केल्याचे देखील उल्लेख सापडतात. याचाच अर्थ वैदिक काळापासून अयोध्या नगरी ही अस्तित्वात होती व एक तीर्थस्थळ म्हणून सर्व परिचित देखील होती.

अधिक वाचा  स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची :भाग – ५ : साधू, संन्यासी व बैराग्यांची नगरी - अयोध्या 

– डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love