पुणे – रा.स्व.संघ समर्थ भारत योजनेद्वारे पुणे महानगरपालिका, रा.स्व.संघ जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आपदेचा सामना करण्यासाठी पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.अशी माहिती पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली.
पी.पी.सी.आर ( Pune Platform for covid responce), सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या सहयोगाने हे कोविड केअर सेंटर गुढीपाडव्यापासून कार्यान्वित झाले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वे नगर येथील बाया कर्वे वस्तीगृहात सुरु करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये ४५० बेडची सुविधा करण्यात आली आहे. एका खोलीत तीन रुग्णांची व्यवस्था असेल. कोणतीही लक्षणे नसलेली पण कोरोना अहवाल पॉझीटीव्ह असलेले रुग्ण ज्यांना विलगीकरण आवश्यक आहे आणि घरात सुविधा नाही अशा रुग्णांना हे कोविड केअर सेंटर वरदान ठरणार आहे. या रुग्णांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी संपूर्ण दिवसभराची दिनचर्या तयार करण्यात आली आहे. त्यात सकाळचा चहा, नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण, औषधे, प्राणायाम आदींचा समावेश असेल. एकूण ८ डॉक्टर्स आणि २५ स्वयंसेवक कार्यकर्ते त्यांच्यासाठी सर्व वैद्यकीय आणि आवश्यक सुविधा पुरविणार आहेत. आय सी. एम.आर. च्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व सेंटरमध्ये काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्या निर्देशानुसार रुग्णास १० ते १२ दिवस कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने आवश्यकता भासल्यास रुग्णांना पुढे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम रुग्णांच्या तब्येतीची काळजी घेण्यास सजग असणार आहे. ज्या रुग्णांना समुपदेशनाची आवश्यकता लक्षात येईल त्यांना समुपदेशनाची व्यवस्था सेंटरमध्ये करण्यात आली आहे. राज्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांचा आकडा आणि पुण्यातील रुग्णांची स्थिती पाहता सातत्याने कोविड केअर सेंटर ची गरज असल्याचे जाणवत होते. मार्च २०२० मध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आणि नंतर कोरोनाचा उद्रेक झाल्यावर गरवारे महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. आता फेब्रुवारी २०२१ मध्ये रुग्णांचा आकडा वाढत असताना त्यांच्या सुविधेसाठी रा.स्व. संघाने पुढाकार घेऊन हे नवीन सेंटर संपूर्णपणे विनामूल्य सुरु केले आहे. पुणेकर नागरिक कोरोना आपदेमध्ये अनेक संकटांचा सामना करतांना अशा स्वरूपाचे सेंटर नागरिकांच्या सुविधेसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास महेश करपे यांनी व्यक्त केला. स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असणारे नागरिक samarthbharat.org वर संपर्क करू शकतात. अधिक माहितीसाठी आणि रुग्णनोंदणीसाठी हेल्पलाईन संपर्क – ९३५९६९३०४५
यावेळी पी.पी.सी.आर चे मुख्य समन्वयक सुधीर मेहता,रा.स्व. जनकल्याण समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक,मुकुंद भवन ट्रस्ट चे पुरुषोत्तम लोहिया,परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे मुकुल कुलकर्णी, श्रीमती अर्चना तांबे – पाटील,महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष रवी देव उपस्थित होते.
स्वयंसेवक करत आहेत विनामूल्य काम
कोविड केअर सेंटरमध्ये संपूर्ण स्वयंसेवी पद्धतीने स्वयंसेवक कार्यरत असून त्यांना त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या स्वयंसेवकांनी आठ दिवस काम करून आठ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. अत्यंत आस्थेने चौकशी आणि शुश्रुषा करण्यासाठी स्वयंसेवक विनामूल्य काम करत आहेत.