पुणे शहरात विविध अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू 

Four persons tragically died in various accidents in Pune city
Four persons tragically died in various accidents in Pune city

पुणे(प्रतिनिधी)-पुणे  शहरात रस्त्यावर गंभीर स्वरुपाचे अपघात सध्या वाढत आहेत. शहरात वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा, सासवड – हडपसर रस्ता,कात्रज-कोंढवा रस्ता तसेच नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहे.

पुणे -नगर रस्त्यावर लोणीकंद परिसरात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रघुनाथ रंगनाथ इंगळे (वय ६५, रा. लोणीकंद, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी संदेश सेंगर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार इंगळे नगर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने दुचाकीस्वार इंगळे यांना धडक दिली. दुचाकीस्वार इंगळे यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर, धायरी फाटा परिसरात पादचारी तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. सतीश रामचंद्र इंजे (वय ३९, रा. नऱ्हे,पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंजे यांचे मावसभाऊ निलेश आढाव (वय ४८, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. सातारा) यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंजे दररोज सकाळी चालायला जात त्याप्रमाणे ते धायरी फाटा पूल परिसरातून नांदेड सिटीकडे चालत निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने इंजे यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या इंजे यांचा उपाचारांपूर्वीच मृत्यू झाला.

अधिक वाचा  साठ वर्षांच्या काळात कॉँग्रेसने ८० वेळा घटनेची मोडतोड करण्याचं पाप केलं- नितीन गडकरी : मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन

सासवड-हडपसर रस्त्यावर वडकी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबला होता. ट्रकच्या पाठीमागील बाजूचे दिवे सुरू नव्हते. अंधारात थांबलेल्या ट्रकवर दुचाकीस्वार रितेश पाठीमागून आदळला आणि त्याचा मृत्यू झाला. रितेश सतीश शेंडगे (वय २१, रा. फुरसुंगी, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पीएमपी कर्मचाऱ्याच्या मृत्यू

बंद पडलेली बस दुरुस्त करताना पाठीमागून दुसऱ्या पीएमपी बसने धडक दिल्याने पीएमपी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. गणेश शिवाजी गुजर (वय ४० रा. कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पीेमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुजर यांचे वडील शिवाजी यांनी फिर्याद दिली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर  पीएमपी बसमध्ये बिघाड झाल्याने बस बंद पडली. बस दुरुस्तीसाठी पीएमपी कर्मचारी गणेश गुजर तेथे गेले. बस सुरू न झाल्याने ओढून नेण्यासाठी (टोईंग बस) बस मागविण्यात आली. दोन बसच्या मधोमध गणेश थांबले होते. त्यावेळी बसच्या धडकेत गणेश यांचा मृत्यू झाला. बसचालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love