पुणे—भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा आणि सांगलीच्या चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शनातील विविध वस्तूंच्या स्टॉलला भेट देऊन खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर हे प्रदर्शन भरले असून दिनांक 20 जानेवारी टे 29 जानेवारी 2023 असे दहा दिवस सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रवेश विनामूल्य आहे. पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालयाचे (हस्त शिल्प) सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग, माजी नगरसेवक अनिकेत काटे, सौ. शीतल शीतोळे, चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किरण चव्हाण, सचिव बी.एस चव्हाण, प्रकल्प संचालक रमेश मनगेनी, सदस्य स्नेहलता चव्हाण, जेष्ठ नागरिक संघाचे जयवंतमामा मोरे, नृत्य कलाकार फिरोज मुजावर आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉलला भेट देऊन प्रदर्शनातील हस्तकलेपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंची माहिती घेतली.
या प्रदर्शनामध्ये भारतातील नामवंत हस्त कलेच्या केन-बांबू, कोल्हापुरी चप्पल, तेराकोटा, एब्रॉयडरी, ज्वेलरी, जरदोशी, गोल्डन ग्रासच्या चटई, बॅग्ज, पर्स, ड्रेस मटेरियल, मधूबनी पेंटिंग, साड्या, दुपट्टा, लेदरच्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
राजस्थान, ओरिसा, उत्तरप्रदेश, दिल्ली, आग्रा, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, मुंबई, गोवा, कोल्हापूर , कर्नाटक, सोलापूर, माथेरान, सांगली, पुणे, सातारा, रत्नागिरी अशा विविध ठिकाणांहून हस्त कारागिरांचे स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत.
उद्घाटनपर भाषणात सुनील तांबे म्हणाले, भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला बघावयास मिळते. देशाच्या विविध भागातून आलेल्या हस्तकला कारगिरांच्या कलेची ओळख आपल्याला होते. या माध्यमातून एका संस्कृतीची दुसऱ्या संस्कृतीला देवाण घेवाण होते.
चंद्रशेखर सिंग म्हणाले, 2020 पासून कोरोनाच्या संकटामुळे प्रदर्शन भरले नव्हते. कोरोना नंतरचा हा पहिला उपक्रम पुण्यामध्ये घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा एम.एस.एस. योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जातो. हस्तकला कारगिरांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या मागचा हेतु आहे.
बी. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक रमेश मनगेनी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्य कलाकार फिरोज मुजावर यांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने उपस्थितांची मने जिंकली.