पुणे –कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील येरवडा कारागृहाजवळ सुरु केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या कैद्यांनी पलायन केल्याची घटना मध्यरात्री घडली. यापूर्वीही तात्पुरत्या सुरु असलेल्या कारागृहातून कैदी पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येरवडा कारागृहातील बिल्डिंग क्रमांक ४ मधील पहिल्या मजल्यावरील रुममध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे हे दोघेही सर्वांची नजर चुकवून पळून गेले आहेत. जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत हे दोघे होते. अनिल विठ्ठल वेताळ (वय २१, रा. गणेशनगर, भीमा कोरेगाव, ता. शिरुर) आणि विशाल रामधन खरात (रा. समर्थ सोसायटी, निगडी) अशी पळून गेलेल्या दोघा कैद्यांची नावे आहेत.
अनिल वेताळ याला मारहाण करुन लुट केल्याचा गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर, विशाल खरात याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात चिखली पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना येरवडा तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे ठेवताना केलेल्या चाचणीत दोघेही कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.