ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल विषयक योजनांतून प्राजची जगभर भरारी


पुणे : व्यवसायवाढ आणि सामाजिक बांधीलकीच्या उद्देशाने प्राज इंडस्ट्रीज करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देण्यासाठी कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला. कंपनीने आपल्या वाटचालीच्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशीपुरा आणि मुख्य वित्तीय अधिकारी व संचालक (रिसोर्सेस) सचिन रावळे हे याप्रसंगी उपस्थित होते.

शाश्वत विकासाचे महत्त्व डॉ. चौधरी यांनी याप्रसंगी विषद केले आणि हवामान बदलांच्या दुष्परिणामांचा मुकाबला निकराने करण्याची गरज व्यक्त केली. हवामान बदलांमुळे जगभरातील विमा कंपन्यांचे वार्षिक शंभर अब्ज डॉलरहून अधिक नुकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जैवअर्थव्यवस्थेला चालना हा हवामानबदलांवरील शाश्वत उपाय निष्पन्न होत असल्यावर त्यांनी भर दिला. अशी जैवअर्थव्यवस्था उभी राहावी, यासाठी अक्षय रसायने व जिन्नस (रिन्युएबल केमिकल्स अँड मटेरिअल्स – आरसीएम) आणि जैवइंधने या दोन्ही आघाड्यांवर आपल्या कंपनीने जी प्रगती साधली आहे, त्याची माहिती त्यांनी दिली.

हवामानबदलांना कारणीभूत कर्बोत्सर्ग कमी करण्यासाठी आरसीएमच्या रूपात शाश्वत पर्याय ‘प्राज’ विकसित करत आहे. पॉलिलॅक्टिक अॅसिडच्या (पीएलए) रूपात बायोप्लॅस्टिकची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले आहे. बायोप्रिझम मंचावरील हे तंत्रज्ञान प्लॅस्टिकच्या संकटाला अटकाव करण्यासाठीचे आणि एकल वापराच्या प्लॅस्टिकवरील बंदीचा पुरस्कार करणारे पाऊल आहे. या बायोप्लॅस्टिकच्या तंत्रज्ञानाचा व्यापारी हेतूंनी वापर होण्याला गती मिळावी, यासाठी कंपनी पुण्याजवळ जेजुरी येथे पॉलिलॅक्टिक अॅसिडचा पथदर्शी प्रकल्प उभारत आहे. प्रथमच अशा प्रकारची प्रकल्प उभारणी यानिमित्ताने होईल. अन्नपदार्थांमध्ये वापरता येणारे लॅक्टिक अॅसिड आणि पॉलिलॅक्टिक अॅसिड यांचे उत्पादन या पथदर्शी प्रकल्पातून केले जाणार आहे.

अधिक वाचा  डॉ. विजय भटकर यांना यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

रस्तेवाहतुकीतून होणारा कर्बोत्सर्ग कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण हा पर्याय आता प्रस्थापित झाला आहे. आता हवाई वाहतुकीने होणारा कर्बोत्सर्ग कमी करण्यासाठी शाश्वत हवाई इंधनाचा (सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल – एसएएफ) पर्याय पुढे येत आहे. कंपनीने यासंबंधी जिवो या अमेरिकी कंपनीच्या सहयोगाने तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि या इंधनाच्या उत्पादनासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी सामंजस्य करारही केला आहे. शाश्वत हवाई इंधन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी फ्रान्सच्या अॅक्सेन्स कंपनीशीही ‘प्राज’ने अलीकडेच करार केला आहे. या सर्व प्रयत्नांमधून कंपनी शाश्वत हवाई इंधन क्षेत्रातील व्यवसायसंधींचा लाभ घेण्यासाठीची भक्कम औद्योगिक परिसंस्था उभारत आहे.

ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल यांसाठीच्या प्रयत्नांतून निर्माण होत असलेल्या व्यवसायसंधी साधण्यासाठी अतिअत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे ‘प्राज’च्या नियोजनात आहे. शंभर कोटी रुपयांचा हा प्रकल्प देशातील एका महत्त्वाच्या बंदराजवळ उभारला जाईल. कांडला येथील सध्याच्या उत्पादन केंद्रातून तेल व वायू आणि खतांच्या बाजारपेठांसाठीच्या उत्पादनांचा पुरवठा चालूच राहणार आहे

अधिक वाचा  केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

जागतिक जैवअर्थव्यवस्थेत चार दशके राखलेल्या अधिक्याची संपन्न परंपरा प्राज इंडस्ट्रीजला लाभली आहे. तो आलेख चढता ठेवताना व्यवसायक्षितिजावरील नव्या संधीही साधण्यासाठी कंपनीने सर्वंकष परिवर्तनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा योजनाबद्ध आराखडा तयार करण्यासाठी बेन आणि कंपनी या जगातील अव्वल व्यवसाय सल्लासंस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या दशकात कंपनीची वाटचाल शाश्वत विकास साधणारी राहील आणि जैवअर्थव्यवस्थेमध्ये जागतिक स्तरावर प्राज इंडस्ट्रीजचे असलेले आघाडीचे स्थान कायम राहील, हे त्यातून सुनिश्चित केले जाणार आहे.

जागतिक हवामान बदलांची दखल व्यावसायिक स्तराबरोबरच सामाजिक स्तरावरही घेण्यासाठी प्राज इंडस्ट्रीज वचनबद्ध आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मांदेडे हे गाव कर्बभाररहीत आणि हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव म्हणून विकसित करण्याचा प्रकल्प कंपनीने हाती घेतला आहे. प्रकल्पाच्या निकषांकनात गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था सहयोग देईल. गावपातळीवरील हरितगृह वायूंच्या उत्सर्गावर जैवाधारित पर्याय शोधून हा उत्सर्ग कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

या सर्व घडामोडींची माहिती वार्तालापामध्ये देताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “हवामान बदलांविषयीची वाढती जागृती आणि जगभरातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गरजा यांत आमच्या कंपनीसाठी अभूतपूर्व अशा व्यवसायसंधी निर्माण झाल्या आहेत. संशोधन व विकास ते आरेखन व कार्यवाही अशी संपूर्ण व्यवसायसाखळी उपलब्ध करून देणे हे आमची आगळी व्यवसायप्रणाली आहे. त्यामुळे या संधींचा लाभ उठवण्यास आम्ही सक्षम आहोत. व्यवसाय हाताळण्याची क्षमताही आणखी वाढवण्यामध्ये आम्ही गुंतवणूक करत आहोत. त्यामुळे कंपनी म्हणून वाढीच्या नव्या वळणावर आम्ही उभे ठाकत आहोत.”

अधिक वाचा  सॉलिडरीडाड एशिया आणि सीआरबी हवामान बदलाशी सामना करण्यासाठी रिजेनॅग्री कॉटन अलायंसची स्थापना करणार

प्राज इंडस्ट्रीजची स्थापना १९८३मध्ये शेतमालप्रक्रिया उद्योग म्हणून झाली होती. शेतकऱ्यांना एकात्मिक विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचा त्यामागील उद्देश होता. १९९३मध्ये कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (इनिशिअल पब्लिक ऑफर – आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश केला होता. सर्वांत यशस्वी आयपीओंपैकी एक अशी त्याची गणना झाली होती. २००३मध्ये भारतात स्वदेशी इंधन म्हणून जैवइंधनांसाठी दरवाजे खुले होण्यास सुरुवात झाली, तेव्हा जगभरातील सामाजिक-आर्थिक-पर्यावरणीय स्थितीवर परिणामकारक उपाय म्हणून ‘प्राज’ने या क्षेत्रात प्रवेश केला. जैवइंधन उद्योगाला भारतात २०१३पासून चालना मिळू लागली. २०२३च्या सुरुवातीपर्यंत पेट्रोलमध्ये ११% इथेनॉलमिश्रण करण्यापर्यंत या आघाडीवर आपल्या देशाने मजल गाठली आहे. गेल्या चार दशकांमध्ये कंपनीने पाच खंडांमधील शंभराहून अधिक देशांमधील एक हजारांहून अधिक ग्राहकसंस्थांशी व्यवसायसंबंध प्रस्थापित केले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love