पुणे(प्रतिनिधी)– पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी ड्रग (Drug) कुणी व कुठून आणले, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, आदल्या दिवशीही स्टेबर्ड हॉटेलच्या (Steburd Hotel) खोलीमध्ये काही व्यक्ती येऊन गेल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) व श्रीपाद यादव (Shripad Yadav) यांच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्य प्राशन केल्याचे आढळून आले आहे.
प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (NCP – Sharad Pawar) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती आहेत. प्रांजल खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी (Kharadi) परिसरातील एका सोसायटीमध्ये ड्रग पार्टी (Drug Party) केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून (Crime Branch) करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आली आहे. या कारवाईत प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाने (Sassoon General Hospital) दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या (PunePolice) गुन्हे शाखेने सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सात जणांना वैद्यकीय तपासणीसाठी आणले. त्यांनी मद्य आणि अमली पदार्थांचे (Narcotics) सेवन केले आहे का, हे तपासण्यासाठी सर्वांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्य घेतल्याचे आढळले आहे. ससूनमधील (Sassoon) मुख्य वैद्यकीय अधिकाऱयांनी सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने सीलबंद करून पोलिसांच्या हवाली केले आहे. हे नमुने अंमली पदार्थांच्या (Narcotics) तपासणीसाठी आता न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसांत येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये ड्रग पार्टी सुरु असल्याची खबर रात्री साडे अकरा वाजता मिळाली. तेथे आमच्या टीमने छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठय़ा प्रमाणात मद्याचा साठा आणि हुक्काचे फ्लेवर (Hookah Flavors) सापडले. ड्रग असल्याची खबर असल्याने पोलिसांनी कसून तपासणी केली. तेव्हा एका टेबलवर एक सिगारेटचे पाकीट सापडले. त्यामध्ये एक पुडी कोकेन (Cocaine) होते. तर एका महिला आरोपीच्या पर्समध्ये दोन पुड्या कोकेन आणि गांजा (Ganja) होता. कदाचित छापा पडल्याचे लक्षात आल्यावर कोकेन पर्समध्ये लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असा कयास आहे. मात्र ड्रग घटनास्थळी कोणी आणि कोठून आणले, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्रांजल हा एकनाथ खडसेंचा जावई असल्याचे आम्हाला तपासाअंती कळाले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस आयुक्तांची भेट रद्द
प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीने या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत. सोमवारी सकाळी रोहिणी खडसे (Rohini Khadse) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पोलीस आयुक्तांची भेट घेणार होते. मात्र, अचानक त्यांनी दौरा रद्द केला.
पोलीस कोठडी आज संपणार
दरम्यान, अटक आरोपींची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यांची पोलीस कोठडी मंगळवारी संपत आहे. मात्र, दोन महिला आरोपींसह सातही आरोपी रिलॅक्स असल्याचे दिसून आले.