पुणे -काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पुणे मनपा वृक्ष समितीचे माजी सदस्य एडविन रॉबर्ट्स (वय 68) यांचे आज सकाळी नोबल हॉस्पिटल येथे करोनामुळे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
काँग्रेस पक्षात ते अतिशय सक्रिय होते. तसेच सर्व लोकसभा व विधानसभा निवडणुका व पुणे फेस्टिव्हल यांच्या प्रसिद्धीच्या कामात त्यांची मोठी भूमिका असायची. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग) अध्यक्षपद त्यांनी भूषविले. पुणे महानगरपालिका वृक्ष समितीचे सदस्य म्हणून त्यांनी ‘हरित पुणे’ चळवळीसाठी मोठे योगदान दिले. पुण्यातील विविध चर्च व ख्रिश्चन संघटनांशी ते निगडित होते.
‘एडविन रॉबर्ट्स हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते होते. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता गोरगरिबांसाठी काम करायचे हीच त्यांची वृत्ती होती. त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्ष एका कर्तबगार ज्येष्ठ कार्यकर्त्यास मुकला’ अशा शब्दांत पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
‘सर्व समाजात मिसळून तळागाळातील जनतेच्या मदतीसाठी सदैव पुढे असणारे व काँग्रेसचे सच्चे निष्ठावंत असणारे एडविन रॉबर्ट्स यांच्यासारख्या मनस्वी कार्यकर्त्याचा करोनामुळे झालेला अकाली अंत जिवाला चटका लावून गेला. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याची उणीव काँग्रेस पक्षाला सदैव जाणवेल’ अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.