पुणे: पुण्यातील लिबरल आर्ट्स शिक्षण या विषयाच्या तज्ज्ञ आणि श्री बालाजी विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या आर्ट्स, हयुमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस विभागाच्या प्राचार्या डॉ. प्रीती जोशी यांना ‘आंत्रप्रेनिअरशिप अँड बिझिनेस सस्टेनेबिलिटी’ या विषयावर भूतानला होणाऱ्या ५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवणासाठी आयोजकांतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. जोशी या प्रतिष्ठित ‘फर फेलोशिप फॉर दलाई लामा स्टडीज’च्या फेलो आहेत.
येत्या ३ ते ५ मे दरम्यान भूतानमधील कांगलुंग येथील शेरुबत्से महाविद्याल येथे सदर परिषद संपन्न होणार आहे. अमेरिका, भारत, नेपाळ, बांग्लादेश व भूतान या देशांमधील विविध संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. युथ एम्पॉवरमेंट अँड रिसर्च असोसिएशन, कॉमर्स अँड मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय) व भूतान येथील नॉरबुलिंग रिगटर कॉलेज (एनआरसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेदरम्यान या क्षेत्रातील शैक्षणिक तज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, मॅनेजमेंट प्रोफेशनल्स, विद्यार्थी यांमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे.तसेच शोध निबंध सादर केले जाणार आहेत. आर्थिक शाश्वतता, सांस्कृतिक वारसा, सामाजिक शाश्वत विकास, बिझिनेस स्टार्ट अप, आपत्ती व्यवस्थापन, डिजिटल इकॉनॉमी, लिंग समानता, कृत्रिम बुद्धीमत्ता, रिस्क रिडक्शन मॅनेजमेंट, पर्यावरणीय शाश्वतता, व्यापार व गुंतवणूक, शाश्वत उर्जा, येणारी आव्हाने कमी करून आशियातील पर्यटनाला चालना देणे आदी विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.