Dr. Baba Adhav : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते, विचारवंत आणि ‘एक गाव एक पाणवठा’ मोहिमेचे जनक डॉ. बाबा आढाव यांचे पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी दु:खद निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देणारा एक ध्येयवादी लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या मागे त्यांच्यामागे पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांच्या वर्तुळात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र, वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती चिंताजनक असताना जेष्ठ नेते शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. बाबा आढाव यांचे पार्थिव आज मंगळवारी सकाळी १० वाजता हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे एक महत्त्वाचे पर्व समाप्त झाले आहे.
प्रारंभिक जीवन आणि समाजकारणाची दीक्षा
१ जून १९३० रोजी पुण्यात जन्मलेले डॉ. बाबा आढाव यांचे आयुष्य संघर्षातून उभे राहिले. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. १९४९ मध्ये मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण झाल्यावर, त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम करत असतानाच आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील वारकरी सांप्रदायिक तर आजी सत्यशोधक चळवळीतील असल्याने त्यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आणि पुरोगामी विचारांची दीक्षा मिळाली. १९३० मध्ये वडिलांचे निधन झाल्यावर त्यांचे संगोपन आजींनी केले.
संघर्षमय कारकीर्द आणि कामगारांना न्याय
कामगार नेते: १९४३ ते १९५० दरम्यान राष्ट्रसेवा दलात काम करताना त्यांचा पुण्याच्या तालमीतून हमाल-कामगारांशी जवळचा संबंध आला. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे १९६१ मध्ये पुण्यात हमाल कामगार कायदा अस्तित्वात आला. १९८८ मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
वैद्यकीय सेवेचा त्याग: त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता, पण केवळ पैसा मिळवणे हे ध्येय नसल्याने त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला आणि १९६६ मध्ये* वैद्यकीय व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली.
राजकीय सहभाग: ते १९६३ मध्ये नागरी संघटनेकडून पुणे मनपा सदस्य म्हणून निवडून आले. १९७० मध्ये त्यांनी नैतिक भूमिकेतून राजीनामा दिला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता.
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे जनक
डॉ. बाबा आढाव यांचे सर्वात मोठे योगदान सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आहे.
‘एक गाव एक पाणवठा’ (१९७६): अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी ही अभूतपूर्व मोहिम सुरू केली, जी देशभर गाजली. याच काळात त्यांचे ‘पूनर्वलोकन’ आणि ‘शेटजी-भटजींचे दास’ हे लेखन प्रसिद्ध झाले.
म. फुले समता प्रतिष्ठान: १९७४ मध्ये त्यांनी खानवडी (पुरंदर) येथे श्री. ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानची स्थापना करून सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेला. ते ‘सत्यशोधक’ या त्रैमासिकाचे संपादक होते.
प्रकल्पग्रस्तांचा कायदा: १९८३ मध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेची स्थापना केली. त्यांच्या अभूतपूर्व सत्याग्रहामुळेच देशात प्रथमच प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा कायदा करण्यात आला.
देवदासी पुनर्वसन: १९८४ मध्ये त्यांनी गडहिंग्लज येथे पहिली देवदासी पुनर्वसन परिषद भरवली.
तुरुंगवास आणि उपोषणे
जनसामान्यांच्या न्यायासाठी लढताना त्यांनी अनेकदा कारागृहवास आणि उपोषणे सोसली. आणीबाणीच्या काळात (१९७५-७७) त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. तसेच, नामांतराच्या प्रश्नावर त्यांनी १७ दिवसांचे उपोषण केले होते आणि अन्नधान्य भाववाढ व दुष्काळग्रस्तांच्या लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ते डॉ. राममनोहर लोहियांच्या विचारांनी प्रेरित होते.
सन्मान आणि अखेरचा लढा
डॉ. बाबा आढाव यांना त्यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये पुण्यभूषण पुरस्कार (२००६), ‘द वीक’ मासिकाने दिलेला ‘मॅन ऑफ द इयर’ सन्मान (२००७) आणि टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार (२०११) यांचा समावेश आहे.
त्यांनी गेल्यावर्षी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी सलग तीन दिवस ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी ईव्हीएमवर टीका केली होती. त्यानंतर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरु केलं होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिवून त्यांनी आपलं उपोषण सोडलं होतं.













