मुंबई- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यासह राज्यातील विविध शहरणांमध्ये रस्त्यावर उतरले. पुण्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. जोपर्यंत राज्यशासन निर्णय बदलत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले तर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून मला अंधारात ठेवून परस्पर घेतलेला निर्णय आहे असे म्हटल्यानंतर आणि या मुद्द्यावरून राजकारण तापायला लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परीक्षा आठवडाभरात होतील अशी घोषणा केली. उद्या(शुक्रवारी) परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मी नेहमी रविवारी बोलतो. आज जे वातावरण तयार करण्याच्या प्रयत्न झाला त्यावर मी बोलणार आहे. त्यानंतर साहजिकच कोरोनार बोलणार आहे. गेल्यावर्षी दिवाळीआधी या परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. ती पुढे ढकलल्यानंतर सांगितलं होतं, या पुढे जी तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही. तशी ती तारीख या 14 मार्चला जाहीर झाली. आता परत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.विद्यार्थी अनेक दिवसांपासून परिश्रम करुन अभ्यास करत आहेत. ही परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. मी स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परीक्षेची तारीख पुढच्या आठ दिवसातीलच असणार आह, असे स्पष्ट करतानाच उगाच कोणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास सुरु ठेवा. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या आठवड्याभरात परीक्षा होईल असे ठाकरे म्हणाले.
परीक्षाचं एखादं केंद्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात असेल तर आपला प्लान बी काय असेल, कुठे परीक्षा आपण ठेवू शकतो याबाबत निर्णय घेणं जरुरीचं आहे. बंदिस्त खोलीत जास्त वेळ राहणं धोकादायक आहे. मला कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळायचं नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी निरोगी असलं पाहिजे. या सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन पुढच्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.