बेळगाव- बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यांनी काल शेळके यांच्यासाठी प्रचार सभा घेऊन कर्नाटक सरकार आणि सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिगांना इशारा देताना ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, अशी तोफ डागली होती. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री दिवगंत सुरेश अंगडी यांच्या पत्नी श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे माजी मंत्री आणि यमकणमर्डीचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतिश जारकिहोळी यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी “गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराच्या विरोधात बेईमानी नको. बेळगावात मराठी माणसाची एकजूट आणि त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न नको. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका”, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे कोणत्याही पक्षाचे नेत्याने बेळगावात येवून मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नका, मग तो कॉँग्रेस, भाजपचा असला तरी त्यांनी असे करू नये. शिवसेना आणि राष्ट्रवादीच प्रश्नच नाही. कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते सुद्धा इथे येवून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतील असे मला वाटत नाही असे ते म्हणाले.