पुणे-गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच श्रीं’च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गणेशोत्सवावर इतर निर्बंध घालण्यात आलेले असले तरी गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांना स्थिर वादन करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
पुण्यातल्या गणेश मंडळांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे. यामध्ये गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांतल्या पाच जणांना स्थिर वादन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच उच्च न्यायालयाने निर्देश केल्याप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरात जाहिरात कमान टाकण्याची परवानगी द्यावी, आणि 2016 साली मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप परवानगी द्यावी, या मागण्याही करण्यात आल्या आहेत.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे न करता साधेपणाने उत्सव साजरा करावा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. यासोबतच मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवत भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी असंही पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. यासोबतच पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी आचारसंहिताही तयार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी आपल्या मागण्यांचं निवेदन पोलीस आयुक्तांना दिलं आहे.