पुणे -पुणे महानगरातील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुण्यातील स्वच्छ रक्तदान ज्येष्ठ प्रसारक श्री. दौलतराम मराठे यांचे नगर येथील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानंतर दुःखद निधन ८८ वर्षाचे होते.
मूळचे खानदेशातील असलेले दौलतराव काही वर्ष धुळ्यास वास्तव्यास होते. त्यानंतर पुणे येथे आल्यानंतर त्यांना संघाचे तत्कालीन प्रांत संघचालक स्व. बाबाराव भिडे यांचा निकटचा सहवास लाभला. जिमखाना परिसरात त्यांनी मंडल प्रमुख म्हणून अनेक वर्षे संघाचे काम केले.
१९८३ साली झालेल्या संघाच्या तळजाई येथील भव्य प्रांतिक शिबिरापासून अनेक छोट्या-मोठ्या वर्गामध्ये दौलतरावांनी व्यवस्था विभागामध्ये काम केले. व्यवस्था जणू त्यांच्या हाडी माशी रुजलेला शब्द बनला. पुढे जनकल्याण रक्तपेढीच्या उभारणीपासून दौलतराव मराठे यांनी अंतर्गत व्यवस्था, रक्तदाता संपर्क रक्तदान शिबिराचे आयोजन, प्रशासकीय कामे अशी अनेक आघाड्यांवर समर्पित वृत्तीने काम केले. जनकल्याण रक्तपेढीच्या सर्व स्तरांतील रक्तदान शिबिरातून दौलतरावांची सातत्याने उपस्थिती असे. जनसेवा बँकेने त्यांच्या सेवावृतीबद्दल बँकेच्या वर्धापन दिनानिमित जनसेवा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. हजारो रक्तदात्यांना रक्तदान प्रेरणेची माळ घातलेला हा रक्तदानाच्या वारीचा वारकरी आषाढी एकादशी-पर्वात पांडुरंगचरणी विलीन झाला. त्यांच्यामागे पत्नी मुलगा, सून विवाहित मुली असा परिवार आहे.