नाशिक – नाशिकच्या चेतना नगर, सावरकर चौक परिसरामधील 12 वर्षाखालील चौदा शाळकरी मुलांनी ‘चेंबर ऑफ सिक्रेट’ या आपल्या बाल मंडळामार्फत गल्लीतील सण उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली आहे. होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या, जळण लाकूड, पूजा साहित्य इत्यादी साठी परिसरातील मुलांनी आपल्या गल्लीतून घरा घरातून 21, 51 रुपये वर्गणी गोळा केली. त्यात त्यांना साधारण 650/- रुपये जमा झाले. त्यापैकी या चिमुकल्यांनी करोना मुक्ती साठी हातभार म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी प्रत्येकी 101/- रुपये ऑनलाईन जमा केले. उर्वरित रक्कमेतून होळीचा खर्च भागवण्यात आला.
बाल मंडळाच्या कार्यकर्त्यांत सर्वेश सोनवणे, सर्वज्ञ अमृतकर, अथर्व मयेकर, गौरव कावले, अर्चित जाधव, प्रसुन तिवारी, सार्थक जामोदे, आराध्य डोळस, सर्वेश प्रभुणे, सृष्टी मयेकर, प्रथमेश सोनवणे, श्लोक शिंदे, प्रतीक तिवारी, सिद्धेश शिंदे, सर्वेश देशमुख यांचा समावेश आहे. शासन करोना निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. आपलाही त्यात सहभाग असावा यासाठी सर्वेश सोनवणे आणि सर्वज्ञ अमृतकर यांनी ही कल्पना आपल्या मित्र मंडळात सांगितली आणि आज रविवारी पोस्ट बंद असल्यामुळे मनी ऑर्डर करणे शक्य नसल्याने आपल्या दीदी ला ऑनलाईन जमा करण्यास सांगितले. चिमुकल्यांना लहान वयात सामाजिक जाणिवा निर्माण होऊन त्यासाठी समर्पणाची भावना निर्माण व्हावी यासाठी चेतना नगर मधील मुलांच्या पालकांनी या उपक्रमात मुलांना प्रोत्साहन दिल्याचे पालक योगिता अमृतकर यांनी सांगितले. या उपक्रमा मुळे मुलांमध्ये एकीची भावना अधिक घट्ट होऊन आपणही सामाजिक कार्याला हातभार लावू शकतो या बाबत आत्मविश्वास निर्माण झाल्याचे पालकांनी निरीक्षण नोंदवले.