लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही- चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे- वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विना शासकीय ताफा आणि वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल असे म्हणत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

लॉकडाऊन न लावता कोरोना चाचण्या वाढवण्यावर सरकारने भर द्यावा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदार संघात हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती परिसरात पोलीस चौकी उभारावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक रुपयाचे ही पॅकेज महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले नाही.झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची अवस्था सध्या खूप बिकट आहे. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल. प्रत्येक झोपडपट्टीतील नागरिक दिवसभर काहींना काही काम करतात आणि त्यानंतर त्यांना जेवण मिळते. त्यांना तुम्ही आजवर काही दिले नाही. त्यामुळे आता परत कोरोनाचे प्रमाण वाढले म्हणून तुम्ही परत लॉकडाऊन लावणार का ? लॉकडाऊन लावायचे असेल तर हातावर पोट असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना दर महिन्याला पाच हजार रुपयांचे पॅकेज द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे

सरकारने लॉकडाऊन लागू न करता काळजी घेऊन नित्याचे व्यवहार सुरूच ठेवले पाहिजे. नाईट कर्फ्यु सुरू ठेवा, त्याने सर्वसामान्य नागरिकांना काही फरक पडणार नाही. परंतु दिवसभराचे दिनक्रम सुरूच राहिले पाहिजेत. कोरोनावर उपाययोजना म्हणून टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत, कोरोना झालेल्यांची ओळख लवकर पटवा त्यांच्यावर लवकर उपचार करा, उपचार केंद्र वाढवा, परंतु हे न करता तुम्ही लॉकडाऊन लावत असणार तर हे शक्य नाही. आम्ही लॉकडाउनला कडाडून विरोध करू. व्यापारी, कामगारसुद्धा लॉकडाऊनला विरोध करतील, असेही पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *