पुणे–एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्यविरोधी व हिंदूविरोधी तसेच दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,असा तक्रार अर्ज ऍड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
30 जानेवारी 2021 रोजी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेल्या गणेश कला क्रीडा मंदिर या सभागृहात ‘एल्गार परिषद 2021’ नावाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. शरजिल उस्मानी कार्यक्रमास हजर राहिले व आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्यविरोधात व हिंदूंविरोधात भडकावू विधाने केली. उस्मानी यांनी आपल्या भाषणात हिंदू समाज सडलेला आहे, असे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले. त्यांचे हे विधान भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा ठरते. तसेच उस्मानी यांनी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अवमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही, असेही विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर शरजिल उस्मानी यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज ऍड गावडे यांनी दिला आहे. याची प्रत राज्याचे गृहमंत्री व पुणे पोलीस आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे.