ट्विटरवॉर खेळणाऱ्या कलाकार आणि खेळाडूंना छगन भुजबळ यांनी फटकारले, म्हणाले …


पुणे -‘शेतकरी आंदोलन आमच्या देशाचा प्रश्न आहे. त्यावर तुम्ही बोलू नका,’ हे भारतीय सेलिब्रिटींचे परदेशातील सेलिब्रिटींना सांगणे बरोबर आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला भारतीय सेलिब्रिटींना कोणी अडवले आहे ? दोन महिन्यांत शंभर शेतकरी मृत्यमुखी पडले. तेव्हा भारतीय सेलिब्रिटी कुठे होते ? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भारतीय कलाकार-खेळाडू बोलले तर बाहेरचे लोक बोलणार नाहीत. घरातील भांडण सोडवण्यासाठी तुम्ही सहभाग घ्या,’ अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरवॉर खेळणाऱ्या कलाकार आणि खेळाडूंना गुरुवारी फटकारले. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर भुजबळ म्हणाले, ‘एक काळ असा होता की देशाला अन्नधान्य आयात करावे लागायचे. अन्नदात्यामुळे आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. दोन महिन्यांपासून थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण समजून घेणे सरकारचे आणि समाजाचे कर्तव्य आहे. आंदोलक शेतकरी परकीय नाहीत. भारतीय कलाकार आणि खेळाडू शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन बोलत नसल्याने बाहेरचे लोक बोलू लागले आहेत. भारतीय कलाकार आणि खेळाडू दोन महिने गप्प का होते,’ असा सवाल करून भुजबळ यांनी केला.

अधिक वाचा  शरद पवार भाजपला घाबरतात- चंद्रकांत पाटील

‘दिल्लीतील सीमा चीन आणि पाकिस्तानची वाटू लागली आहे. चीन किंवा पाकिस्तानचे सैनिक येणार म्हणून हा बंदोबस्त आहे का ? हेच धाडस देशाच्या सीमेवर केले तर दहशतवाद संपेल. भारतीय हद्दीत गाव वसवण्याची हिंमत चीन करणार नाही,’ अशी बोचरी टीका भुजबळ यांनी आंदोलन मार्गावर खिळे लावण्याच्या प्रकारावर केली.

 ‘धर्मावर टीका किंवा चर्चा करायला बंधन नाही. दुसऱ्या धर्मात त्रुटी असतील तर बोलले पाहिजे; पण शब्द कोणते असावे ही  काळजी घेतली पाहिजे. मुस्लिम धर्मातील वाईट प्रथांबद्दल हिंदू धर्मीय चुकीच्या शब्दांत बोलले तर त्यांनाही वाईट वाटेल. वाद निर्माण करण्यापेक्षा सुधारणा अपेक्षित आहेत. एल्गार परिषदेत शर्जील उस्माणीने वापरलेले शब्द चुकीचे असून पोलिस योग्य ती कारवाई करतील. मनुवादावर आम्हीही बोलतो; पण टीका करताना तारतम्य हवे,’ असे छगन भुजबळ म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love