राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल


पुणे-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. सुमारे 8 हजार पानांचं हे दोषारोपपत्र आहे.

पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसलेंसह 7 जण अटकेत आहेत. सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ही माहिती दिली.

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते.

अधिक वाचा  पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर शिवाजीराव भोसले बँकेचे कर्ज आहे. धनंजय मुंडे यांनी 1 कोटी 43 लाख रुपये थकवल्याचं बँकेचं म्हणणं आहे. संजय काकडे हे राज्यसभेवरील भाजपचे खासदार आहेत. काकडे आणि भोसले एकमेकांचे व्याही आहेत. काकडेंचे दुसरे व्याहीसुद्धा राजकीय क्षेत्रातील आहेत. संजय काकडे यांची कन्या कोमल माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सून आहे. काकडे-देशमुख कुटुंबाच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love