पुणे(प्रतिनिधि)–विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हे सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक आहे. त्यामुळे सीएंच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
पुणे सीए फॅटर्निटीच्या वतीने आयोजित ‘सीए संवाद रोड टू विकसित भारत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ,शशिकांत बर्वे, राजेश अग्रवाल, विवेक मठकरी, रेखा धामणकर, शिरीष कुलकर्णी यांच्या सह चार्टर्ड अकाऊंटंट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्यांमध्ये सीएंचा देखील समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की, माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण सीएनी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. याशिवाय व्यापाऱ्यांना अतिशय जाचक ठरलेला एलबीटी कर रद्द करुन, व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला. त्यामुळे सीए वर्गाने असे समाजाच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होणारे प्रश्न निदर्शनास आणून दिले, तर त्याचा सकारात्मक प्रतिसाद देऊ, असेही त्यांनी यावेळी आश्वास्त केले. तसेच, सीएनी आपल्या समस्यांसाठी नेहमीच प्रशासनाशी संवाद ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत माननीय मोदीजींनी देशासाठी काम केलं. स्वतः साठी काहीही केलं नाही. समाजाच्या शेवटच्या घटकांचा सर्वात पहिल्यांदा विचार केला. हे करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर देश महासत्ता होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही वर्षांत देशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याचे मोदीजींचं स्वप्न आहे.
ते पुढे म्हणाले की, पुणेकर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. मागच्या पाच वर्षांत पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी खूप काम केलं. पुढच्या २५ वर्षाचा विचार करता नवीन विमानतळ, जुन्या विमानतळाचं विस्तारिकरण, मेट्रोचा विस्तार, असे अनेक विषय पुढे घेऊन जायचे आहेत. सीएचे देखील अनेक समस्या असतील, तर त्या दिल्लीत सोडविण्यासाठी काम करायचं आहे; आणि तुम्ही देणारी जबाबदारी शंभर टक्के पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सीए दिनेश गांधी यांनी स्वागत करताना म्हणाले की, सीए राजकारणापासून नेहमीच लांब असतात. जेव्हा सीएंवर अन्याय होतो, तेव्हा सीए त्याचा संघर्ष करत नाहीत. त्यामुळे भविष्यात सीएनी एकत्रित येण्याची गरज आहे. जे आपले प्रतिनिधी होणार आहेत, त्यांच्या पाठिशी आपण आपली ताकद उभी केली पाहिजे. चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ हे आपल्याला नेहमीच उपलब्ध असतात. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली पाहिजे.