पुणे -राज्यसभेसाठी भाजपने माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे संख्याबळ पाहता कुलकर्णी यांची खासदारकी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेची राजकीय गणितेदेखील बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा संदेश कसबा पोटनिवडणुकीमध्ये गेला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे आगामी काळात होणाऱ्या पुणे लोकसभेसाठी मराठा समाजाच्या उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता बळावली आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे हे तीन मराठा चेहरे प्रामुख्याने उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही जोरदार तयारी केली आहे. मात्र, आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांच्या निमित्ताने भाजपने राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केला आहे. त्यामुळे हे गणित बघता पुन्हा लोकसभेसाठी सुनील देवधर यांना संधी दिली जाणार का? यावर आता वेगवेगळी मते मांडली जात आहेत.
मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचेही गणितही पुढे आले आहे. कोथरूडचे विद्यामान आमदार असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री आहेत. त्यात आता कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यापण आता खासदार होणार आहेत. याच मतदारसंघात भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष दिले होते. ही सर्व गणितं बघता आता मुळीक यांना खासदारकीची उमेदवारी मिळेल याची शक्यता बळावली आहे.
—–
चौकट
*मुळीकांनी सोपा केला होता भाजपचा अवघड पेपर*
आगामी लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी जगदीश मुळीक हे इच्छूक आहेत. त्यांनी तशी इच्छादेखील बोलून दाखवली होती. निवडणुकांपूर्वी मुळीक यांनी लोकसंपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे. यासाठी मुळीक यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जात आहे. फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणूनही मुळीक यांची प्रतिमा आहे. भाजपसाठी अवघड असलेल्या वडगाव शेरी सारख्या मतदारसंघात मुळीक यांनी आमदारकी मिळवली होती. तसेच महापालिका निवडणुकीतही मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे आता मुळीक यांना संधी मिळेल, असे गणित राजकीय विश्लेषक मांडत आहेत. युवा चेहरा, स्वच्छ प्रतिमा, शहराध्यक्ष पदाचा पदभार असताना त्यांनी पुणे शहरात जोडलेले कार्यकर्ते, कोविड काळात केलेले कार्य अशा अनेक गोष्टी मुळीक यांच्या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय वडगाव शेरी, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, यामुळे त्यांच्या उमेदवारीला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळणार हे निश्चित मानले जात आहे.