पुणे-पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या मूळच्या परळी वैजनाथ येथील 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली. त्यातच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि विरोधकांनी विशेषत: भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
ऑडिओ क्लिप्स, फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संजय राठोड यांच्याविषयी संशय अधिक संशय बळावला. त्यानंतर संजय राठोड हे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतरजवळजवळ 15 दिवसांनी त्यांनी मंगळवारी पोहोरादेवी आणि संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतले आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
आपल्या विरुद्ध घाणेरडे राजकारण केले जात आहे, मी कुठेही गायब झालो नव्हतो. मुंबईतील निवासस्थानाहून शासकीय कामकाज करत होतो. ओबीसींचं नेतृत्व करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आरोपांमुळे माझं नुकसान – झालं आहे असे सांगत सामाजिक क्षेत्रात असल्याने अनेकांच्या सोबत फोटो काढावे लागतात असे सांगितले. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वाट बघा.,माझ्या परिवाराची बदनामी थांबवा असेही ते म्हणाले होते. पूजा चव्हाणच्या प्रकरणाआडून माझी राजकीय व सामाजिक कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही त्यांनी नमूद केले होते.
राठोड यांच्या कालच्या व्यक्तव्याचा आणि स्पष्टीकरणाचा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी समाचार घेतला आहे. मेटे म्हणाले, गुन्हेगाराला कोणता जात, धर्म नसतो. तुम्ही निष्कलंक आहात तर 15 दिवस लपून का राहिला होतात. सरकारला त्यांना वाचवायचे आहे. या सरकारला नितिमत्ता राहिलेली नाही. याप्रकरणी पोलीस तपास हा संशयास्पद आहे. पोलिसांनी एकदाही चौकशी केली नाही. उलट त्यांची सरबराई करण्यातच पोलिस गुंग होते. पूजा चव्हाण या युवतीचा कशामुळे आणि कोणामुळे हत्या झाली की आत्महत्या झाली हे लोकांना महिती आहे त्यामुळे लोक सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. सर्व चित्र स्पष्ट असताना अशा मंडळींना संरक्षण का दिले जात आहे. उद्धव ठाकरे यांची अशी कुठली मजबूरी आहे ज्यामुळे ते राठोड यांना पाठीशी घालत आहे असा सवाल करीत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही मेटे यांनी केली.