पुणे–भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनी आता पुणेकर झाला आहे. धोनीन रावेत परिसरातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम जवळ फ्लॅट घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरातील इस्टाडो प्रेसिडेंशियल या इमारतीत त्याने फ्लॅट घेतला आहे.
मुळचा रांचीत वास्तव्यास असलेल्या धोनीने यापूर्वी मुंबईतही घर घेतल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता धोनीने पिंपरी-चिंचवडनध्ये नवे घर खरेदी केले आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली असली तरी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून तो अद्यापही क्रिकेटचा आनंद घेत आहे.
पुण्यात घर घेतल्यानंतर काहीवेळा मॉर्निंग वॉकसाठी तो बाहेर पडताना अनेकांनी त्याला बघितले आहे. यामुळे आता महेंद्रसिंग धोनी पुण्यातच स्थायिक होणार का अशी चर्चा देखील सुरू आहे. यामुळे त्याचे पुण्यातील चाहते खुश आहेत.
धोनी आणि पुणे शहर यांच्यात खास कनेक्शनही आहे. आयपीएलमध्ये त्याने पुणे सुपर जाएंट्स संघाचे नेतृत्व देखील केले आहे. एवढेच नाही तर 2018 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे घरचे मैदान हे पुणेच होते. त्यामुळेच कदाचित धोनीने पुण्यात घर घेण्याला पसंती दिली असावी. रावेत परिसरातील एस्टाडो प्रेसिडेंशियल सोसायटीमध्ये धोनीने हे नवे घर घेतल्याचे समजते. पुण्याशिवाय महेंद्र सिंह धोनी मुंबईतही घर बांधत असून मुंबईतील अलिशान घराच्या बांधकामाचे काही फोटो यापूर्वी समोर आले होते. धोनीची पत्नी साक्षी धोनीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुंबईतील घराच्या बांधकामाचे काही फोटो शेअर केले होते.