श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना
पुणे– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पाच आणि प्रमुख मंडळांनी आज आणखी एक स्त्युत्य निर्णय घेतला. यंदा या मंडळांच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. पुण्यातील १२८ वर्षांच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे.
मानाच्या पाच आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरवर्षी समाजातील विविध मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. मात्र, यंदा करोनाचे सावट पाहता गणेश मंडळांच्याच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. या आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणरायाची विधीवत पूजा करणार आहेत.” यंदा करोनाच्या संकटामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन घेतला आहे” असं गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी म्हणाले आहेत.