Bharat Asmita National Award–एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे २२ वे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहिर करण्यात आले आहेत. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
या वर्षी हा पुरस्कार बंगळूर येथील आयआयएमच्या प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, तरुण खासदार ज्योथिमणी सेन्नमलाई, सुप्रसिद्ध अभिनेता आणि मानसोपचार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार व सरोजवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एमआयटीडब्ल्यूपीयूचे चिफ बिलिफ ऑफिसर डॉ. दत्ता दंडगे उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.३० वा. कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी अडीच लाख रूपये रोख, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जागतिक दर्जाचे संशोधन व समाजावर शाश्वत प्रभाव निर्मिती आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणि आंत्रप्रेन्यूअरशीपसाठी विशेष कार्य केल्याबद्दल प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. धडाडीच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या तामिळनाडू येथील तरुण खासदार ज्योथिमणी सेन्नीमलाई, यांना ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येईल. चित्रपट आणि वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या अद्वितिय कार्याबद्दल पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि सरोद या वाद्यासह भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पसरविल्याबद्दल पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येणार आहे.
आपल्या आचार, विचार, कृतीने व सेवेने ज्यांनी देशाच्या नाव लौकिकात भर टाकली. विविध मार्गाने आपली अमूल्य सेवा देशाला समर्पित केली अशा व्यक्तींच्या गौरवासाठी या पुरस्काराची योजना आहे.














