पुणे -महाराष्ट्रात हनुमान चालिसा, जय श्री राम म्हणाले तर अटक होते हे सध्याच्या स्थितीत दिसून येत आहे. अशाप्रकारची परिस्थिती पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत केले.
राज्यात सध्या भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे यासंर्दभात चौबे म्हणाले, कोणत्याही प्रकारचा भोंग्याचा सकाळी अथवा रात्री सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सरकारच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत भोंगे वापरले जाऊ नये असे आहे. त्याची अंमलबजावणी उत्तरप्रदेशसारखे काही राज्य करत असतील तर ते स्वागर्ताह आहे.
ध्वनी, जल, वायू प्रदूषण राेखण्याकरिता प्रशासनाने ही जबाबदारीपूर्वक काम करावे. बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव इफ्तार पार्टीत एकमेकांना भेटले याबाबत ते म्हणाले,वेगवेगळया धर्माच्या सणात एकमेकांनी उत्साहाने भेटण्यास कोणतीही अडचण नाही. बिहार मध्ये कोणतीही राजकीय उलथापालथ आगामी निवडणुकीपूर्वी होणार नाही आणि एनडीएचे सरकार त्याठिकाणी सत्तेत राहिल, असे ते म्हणाले.
महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न
राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे म्हणाले, सन२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महागाई नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तेल ,डाळ याची साठवण करुन कोणी भाववाढ करत असेल तर त्याबाबत छापेमारी करुन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. युक्रेन व रशिया यांच्यातील युध्दामुळे जगावर परिणाम झाला असून तो भारतावरही झालेला आहे.
युध्दाची परिस्थिती लांबल्यास महागाई आणखी वाढू नये याकरिता आप्तकालीन दीर्घ धाेरण ही ठरविण्यात आले आहे. नियंत्रित किंमतीत नागरिकांना धान्य मिळावे यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काेणी काळाबाजार करणार नाही याच्यावरही आमचे लक्ष्य आहे. ‘वन नेशन, वन राशन’ याेजनेनुसार २५ ते ३० लाख लाेकांना लाभ मिळाला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न याेजने अंर्तगत देशभरातील लाेकांना माेफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे.
जंगल विकासाचे दृष्टीने कार्यरत
महाराष्ट्रात २० टक्के जमीन ही वन आच्छदित असल्याचे सांगत अश्विनकुमार चाैबे म्हणाले, राज्यात सहा वाघ अभारण्य आहे. जंगल आणि मानव संघर्षाचे प्रमाण मागील काही दिवसात वाढताना दिसून येते. मागील चार ते पाच वर्षात मानव व जंगल प्राणी संघर्षाच्या चार हजार घटना घडलेल्या आहे. पश्चिम घाटातील वन वैभव टिकविण्यासाेबतच जंगल विकासाचे दृष्टीने वन विभाग कार्यरत आहे. वैद्यकीय कचरा विघटन विषय महत्वपूर्ण असून त्याचे विलगीकरण करुन शास्त्राेक्त पध्दतीने त्याच्यावरील प्रक्रिया राबवून प्रदूषण राेखण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.