यंदाचा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर


पुणे : संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन्मानपूर्वक दिला जाणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना ‘अटल गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 25 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून पुरस्काराचे वितरण राज्याचे विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असे आहे.

अधिक वाचा  महिनाभरात गदिमांच्या स्मारकाचे भूमीपूजन केले जाणार - मुरलीधर मोहोळ

कोथरूड मतदार संघाचे आमदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. खासदार गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपा पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.


‘पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संवाद पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर करणार असून अभिनेत्री भार्गवी चिरमुले नृत्य सादर करणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार आहे,’ अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love