मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट

मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट
मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट

पुणे(प्रतिनिधी)– नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे.

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र, आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

अधिक वाचा  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची एकमताने निवड

मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना  देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वी देखील काढले होते वॉरंट

यापूर्वीही जरांगे यांच्याविरोधात न्यायालयात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर जरांगे मे अखेरीस न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जरांगे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर वॉरंट रद्द केले होते. परंतु, त्यानंतरही जरांगे सुनावणीला गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवाद : सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love