पुणे- सुमधूर घुंगरांचा नाद, त्यास पढंतने चढविलेला साज, नृत्यांगनांनी धरलेला ठेका, त्यास गायन-वादनाची लाभलेली उत्कट साथ अन् क्षणाक्षणाला होणारा टाळ्यांचा कडकडाट अशा अभिजात नृत्य प्रस्तुतीतून जणू समग्र ‘रोहिणी’ घराणे रसिकांना उलगडले. निमित्त होते प्राजक्ता राज यांच्या आरोहिणी आर्ट वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे झालेल्या दोनदिवसीय कथक मैफलीचे. एकीकडे ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीच्या आगमनाने पुण्यनगरी दुमदुमली असताना कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘नृत्यारोहिणी’च्या आनंदडोहात अवघा शिष्यवृंद एक झाल्याची विलक्षण अनुभूती रसिक पुणेकरांना आली.
कथक कलेला वेगळा लौकिक प्राप्त करुन देणाऱ्या विदुषी पं. गुरु रोहिणी भाटे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या औचित्याने वर्षभर नृत्यभारतीतर्फे सुरू असणाऱ्या ‘रोहिणीद्युति’ या अंतर्गत ‘नृत्यारोहिणी’ महोत्सव घेण्यात आला. हा कार्यक्रम एकूण तीन सत्रांत झाला. पहिल्या व तिसऱ्या सत्रात अनुक्रमे, गुरु पं. रोहिणी भाटे यांच्याकडून प्रेरणा घेत प्राजक्ता राज यांनी निर्माण केलेल्या स्वरचित रचना तसेच नृत्यभारतीच्या ज्येष्ठ शिष्या, गुरुभगिनी यांच्या नृत्याविष्काराने रंगलेल्या लयबद्ध सोहळ्याने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या कार्यक्रमास गुरु रोहिणी भाटे यांच्या स्नुषा व प्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे, मनीषा साठे, रोहिणी ताईंचे सुपूत्र सनत भाटे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, मेजर जनरल संजय विश्वासराव, कला व संस्कृती विषयक अभ्यासक मंजिरी सिन्हा, ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक श्यामहरी चक्र, प्रसिद्ध संवादिनीवादक डॉ. अरविंद थत्ते, रोहिणी ताईंच्या ज्येष्ठ शिष्या रोशन दात्ये,अमला शेखर, नीलिमा अध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात जर्मन दिग्दर्शिका कॅरोलिन डॅसेल यांनी २५ वर्षांपूर्वी तयार केलेला ‘काल और अवकाश’ (टाइम अँड स्पेस) हा माहितीपट दाखवण्यात आला. यावेळी नीलिमा अध्ये यांनी अनौपचारिक संवाद साधत रोहिणीताईंच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उलगडले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्राजक्ता राज व त्यांच्या शिष्यांनी प्रथम मान ओंकार ही वंदना सादर करत महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले. चौताल प्रस्तुतीमध्ये उठान, ठाठ, आमद, परण आमद, चक्रदार, तिहाई, गिनती सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. उत्तरार्धात तीनताल, झपताल आणि रुपक यांची सुंदर गुंफण असलेला ३३ मात्रांचा त्रिवेणी ताल पेश करताना गुरूंकडून लाभलेल्या परंपरेचे विलोभनीय दर्शन घडले. कलिकेसारख्या नाजूक विद्यार्थींनींचे ‘हस्तमुद्राविनियोग’ सादरीकरण विशेष भावले. अर्थववेदातून संदर्भ घेत प्राजक्ता राज यांनी रचलेले रात्रीसुक्त त्यांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवून गेले. तर ‘वर्तमानगुप्तानायिका’ या अभिनय अंगात त्यांनी सादर केलेल्या एकल प्रस्तुतीने रसिकांची मने जिंकली. तुकारामांच्या अभंगाने आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पहिल्या सत्राची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात गुरु शिष्य परंपरेचे यथार्थ दर्शन रोहिणीताईंच्या ज्येष्ठ शिष्या व प्राजक्ता राज यांच्या गुरुभनिनींच्या नृत्याविष्कारातून रसिकांना घडले. या मैफलीची सुरुवात गणेश स्तुतीने झाली. पूर्वार्धात साडेअकरा मात्रांचा ताल ‘सोहन’ आभा वांबुरकर व त्यांच्या शिष्यांनी सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
गुरु पं. रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये व आसावरी पाटणकर यांची युगल प्रस्तुती असलेली ‘गहकी गहकी घन उठती है चहू धाते’, राजश्री जावडेकर व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेली ‘जशोदा के मंदिर’, तर गुरु रोशन दात्ये यांच्या ज्येष्ठ शिष्या आभा औटी, धनश्री पोतदार, केतकी वाडेकर व इतर शिष्यांनी चार ताल व चार रागांमध्ये गुंफलेला चतुरंग, गुरु अमला शेखर यांच्या पढंत वर वेणू रिसवडकर, मयूर शितोळे व सिद्धी अभय यांनी सादर केलेली ‘त्रिधारा’, प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्यांनी सादर केलेले ‘भोले शिव’ आदी रचनांनी कार्यक्रमास एका वेगळ्या उंचीवर नेले. उत्तरार्धात मनीषा अभय, ऋजुता सोमण व शर्वरी जमेनिस व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेला २१ मात्रांचा ताल ‘गणेश’ हे देखील कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
‘काळ’ हा सर्वसाक्षी आहे याची जाणीव करुन देणाऱ्या ‘समय‘ या संरचनेने रसिकांना अंतर्मुख केले. बैठकी भावात नायिकांचे भावविश्व उलगडण्याचा केलेला प्रयास प्रेक्षकांना भावला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमात प्राजक्ता राज यांच्या ‘प्रल्हाद’ प्रस्तुतीला रसिकांची वाहवा मिळाली. मनीषा अभय, ऋजुता सोमण, शर्वरी जेमनिस व प्राजक्ता राज यांचा सहज-सुंदर अभिनय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला.
महोत्सवाच्या समारोपाला सर्व सहभागी कलाकारांनी सादर केलेली ‘वंदौ गुरु बिंदा के चरणा’ ही गुरु वंदना बहारदार झाली. एकूण संपूर्ण कार्यक्रमात प्रवाही व लालित्यपूर्ण नृत्यातून व भावस्पर्शी, सूक्ष्म अभिनयातून जणू रोहिणीताईंचे समग्र कार्यच रसिकांसमोर उलगडले, त्यांचे विचार रसिकांना अनुभवायला मिळाले.
यावेळी अर्पिता वैशंपायन, अर्थव वैरागकर (गायन), निखील फाटक, कार्तिकस्वामी दहिफळे (तबला) , कृष्णा साळुंके (पखवाज), यशवंत थिट्टे , अमेय बिचू (संवादिनी ), धवल जोशी (बासरी), आसावरी पाटणकर (पढंत) यांनी समर्पक साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नृपा सोमण यांनी केले. या कार्यक्रमास दर्दी पुणेकरांची भरभरून दाद लाभली.