अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी करणारे आद्य श्री शंकराचार्य


केरळमधील कालडी या गावी शिवगुरु आणि आर्यांबा या सत्वशील, तपस्वी आणि शिवभक्त जोडप्याला बरेच वर्षे अपत्यप्राप्ती झाली नव्हती. शिवाच्या आराधनेने त्यांना खूप वर्षांनंतर पुत्रलाभ झाला, अपत्यसुख मिळाले. तीव्र बुद्धिमत्ता आणि विलक्षण स्मृती असलेल्या या पुत्राची, शंकर याची मुंज शिवगुरुंनी त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षीच केली. वयाच्या आठव्या वर्षीच चारही वेदांचे अध्ययन शंकरने पूर्ण केले. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत शंकर म्हणजेच आदि शंकराचार्यांचा सर्व शास्त्रांचा अभ्यास पूर्ण झाला होता. सोळाव्या वर्षांपर्यंत त्यांनी सर्व भाष्यरचना पूर्ण केल्या. पुढे भारतभर संचार करुन त्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी केली आणि तत्कालीन सर्व आचार पद्धतींचा समन्वय साधून नीतिधर्माची प्रतिष्ठापना केली. आपल्या अवघ्या बत्तीस वर्षाच्या जीवनप्रवासात त्यांनी हिंदू धर्मासाठी प्रचंड कार्य केले.

अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद् ।षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात् ॥

या एकाच श्लोकातून त्यांच्या जीवनाचा आलेख दिसून येतो.

 लोककल्याणाकरिता परमेश्वराने नियुक्त केलेले महापुरूषच देह धारण करुन परमेश्वराच्या इच्छेने इहलोकी कार्य करीत असतात. ज्या ईशयोजनेने पूर्वी त्यांनी कार्य केलेले असते, तेच कार्य करण्याकरिता आपला जन्म आहे, असे अनुसंधान त्यांच्यामध्ये असते. शंकराचार्य याच कोटीतील महर्षी होते.

आचिनोति च शास्त्रार्थं आचारे स्थापयति अधि ।स्वयं अपि आचरेद् य: तु आचार्य: इति स्मृत:॥

                                                                                                                जो सर्व शास्त्रांचा अर्थ स्वत: पूर्णपणे जाणतो आणि दुसर्यांाकडून असा आचार स्थापला जावा म्हणून अहर्निश प्रयत्न करतो, अर्थात असा आचार जो स्वत: आचरणात आणतो, त्याला ‘आचार्य’असे म्हणतात. आदि शंकराचार्यांना अशाच अर्थाने आचार्य ही पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांच्या ‘कैवल्याष्टकम्’ आणि ‘श्लोकत्रयम्’ या रचनांचा विचार या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अधिक वाचा  #Pune Public Policy Festival : शैक्षणिक पदवीपेक्षा धोरणांचा समाजाला आणि देशाला होणारा उपयोग समजून घेणे जास्त महत्त्वाचे

                                                                                                                 जन्माला आलेला जीव सतत काहीतरी मिळवण्यासाठीच धडपडत असतो. त्यातून तो आनंद शोधत असतो. भौतिक जगातील त्याला हव्या त्या सर्व गोष्टी मिळवतोही पण तरीही मिळवायचे काहीतरी बाकी आहेच अशी मनाची अवस्था असते. पण काय ते समजत नसते. कारण या भौतिक सुखसोयींमधून मिळणारा आनंद कालपरत्वे नष्ट होणारा आहे, तो अविनाशी नाही याची जाणीव झालेली असते. त्यासाठी संत जे सांगतात ते शाश्वत सुख, समाधान, आनंद केवळ आत्मज्ञानात आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असते. नाहीतर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे,

 आला आला जीव जन्मासी आला। गेला गेला बापुडा प्राणी व्यर्थ गेला॥

अशी अवस्था होते.  ही अवस्था होऊ नये म्हणून सद्ग्रंथांचा अभ्यास, सज्जनांची संगती आणि आपल्याला आवडेल त्या भक्तिमार्गाने साधना, उपासना करणे आवश्यक आहे. कलियुगात नामस्मरणसाधना अधिक श्रेयस्कर आहे.या नामस्मरणसाधनेचे महत्त्व शंकराचार्यांनी त्यांच्या कैवल्याष्टकम या स्तोत्रातून अधोरेखित केले आहे. या अष्टकात ‘केवलं’ शद्ब महत्त्वाचा आहे. केवल म्हणजे एकमेवाद्वितीय ! हरेर्नामैव केवलम्! भक्तीचा अधिकार सर्वांनाच असतो. या अष्टकात आचार्यांनी नामस्मरणभक्तीमहिमा वर्णन केला आहे.  ज्ञान हेच मोक्षप्राप्तीसाठीचे अनिवार्य साधन असले तरी भक्तीची आवश्यकता ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर अशा दोन्ही स्थितीत असते.या अष्टकातून नामस्मरणभक्ती हे कैवल्यप्राप्तीचे अर्थात मोक्षप्राप्तीचे साधन आहे, हे आचार्यांनी सांगितले आहे.

कैवल्याष्टकम् :

मधुरं मधुरेभ्योऽपि मङ्गलेभ्योपि मङ्गलम्।पावनं पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम्॥१॥

आब्रह्मस्तम्बपर्यन्तं सर्वं मायामयं जगत् ।सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम् ॥ २॥

स गुरुः स पिता चापि सा माता बान्धवोऽपि सः।शिक्षयेच्चेत्सदा स्मर्तुं हरेर्नामैव केवलम्॥ ३॥

निःश्र्वासे न हि विश्र्वासः कदा रुद्धो भविष्यति ।कीर्तनीयमतो बाल्याद्धरेर्नामैव केवलम् ॥ ४॥

हरिः सदा वसेत्तत्र यत्र भगवता जनाः ।गायन्ति भक्तिभावेन हरेर्नामैव केवलम् ॥ ५॥

अधिक वाचा  राज्याचे गृहमंत्री असे करणार नववर्षाचे स्वागत

अहो दुःखं महादुःखं दुःखद् दुःखतरं यतः ।काचार्थं विस्मृतं रत्नं हरेर्नामैव केवलम् ॥ ६॥

दीयतां दीयतां कर्णो नीयतां नीयतां वचः ।गीयतां गीयतां नित्यं हरेर्नामैव केवलम् ॥ ७॥

तृणीकृत्य जगत्सर्वं राजते सकलोपरि ।चिदानन्दमयं शुद्धं हरेर्नामैव केवलम् ॥ ८॥

सृष्टीतील सर्व मधुर पदार्थांपेक्षाही मधुर, सर्व पवित्र, मांगल्यमय वस्तूंहूनही पवित्र, मंगल असे केवल श्रीहरीचे नामच आहे. ब्रह्मदेवापासून स्तंभापर्यंतच्या संपूर्ण मायामय सृष्टीत केवळ श्रीहरीचे नामच त्रिवार सत्य आहे. श्रीहरीचे स्मरण करण्यास शिकविणारा, नामस्मरणाचे संस्कार देणाराच खरा गुरु, पिता, माता आणि बंधु असतो. आपला मृत्यू कधी आहे हे आपल्याला माहीत नसते, अर्थात आपला श्वासोच्छवास कधी थांबेल याचा भरवसा नसतो, म्हणून बालपणापासूनच श्रीहरीचे नामस्मरण करावे. जिथे भगवद्भक्त  भक्तिभावाने श्रीहरीचे नाम घेत असतात, तिथेच परमेश्वराचा वास असतो. सर्व दु:खाहूनही महादु:ख असणार्याे विषयसुखाच्या काचेसाठी मनुष्य श्रीहरी नामस्मरणासारखे रत्न विसरतो. त्यासाठी शंकराचार्य श्रवण आणि गायनाद्वारे श्रीहरीचे नामस्मरण करा असे सांगतात. हे कानांनो हरिनामच ऐका आणि वाचेने त्याचेच गायन करा. कारण हे सर्व जगत तृणाप्रमाणे तुच्छ आहे आणि या सर्वांवर केवळ आणि केवळ सच्चिदानंदमयी असे श्रीहरीचे नामच शोभत आहे.

 निष्ठेने केलेल्या भक्तिसाधनेमुळे साधकाला सद्गुरुकृपेची प्राप्ती होते आणि यथाकाल, यथाधिकारे तो त्या शाश्वत आत्मानंदाचा धनी होतो. अशा वेळी त्या प्रापंचिक साधकाचा प्रपंचच परमार्थमय होतो. परमेश्वराप्रती असलेली निष्ठा, अनुसंधान आणि स्वीकारलेला भक्तिमार्ग या त्रयीयोगे अशी परमानंदप्राप्ती झालेल्या साधकाची अवस्था शंकराचार्यांनी पुढील श्लोकत्रयम मध्ये वर्णन केली आहे.केवळ तीन श्लोक असलेले हे शंकराचार्यकृत प्रकरण अतिशय मननीय, चिंतनीय आहे.  या श्लोकांचा अर्थ थोडक्यात समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न –

अधिक वाचा  गडी एकटा निघाला... : रोहीत पवारांचे ट्वीट

श्लोकत्रयम् :

स्नातं तेन समस्ततीर्थसलिले दत्ता च सर्वा‍ऽनिःयज्ञानां च सहस्त्रमिष्टमखिला देवाश्च संपूजिताः ।

संसाराच्च समुद्‌धृताः स्वपितरस्त्रैलोक्यपूज्योऽप्यसौयस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि स्थैर्य मनःप्राप्नुयात ॥१॥

कुलं पवित्रं जननी कृतार्था विश्वम्भरा पुण्यवती च तेनअपारसंवित्सुखसागरेऽस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः ॥२॥

संपूर्ण जगदेव नन्दनवनं सर्वेऽपि कल्पद्रुमाःगाङ्गं वारि समस्तवारिनिवहः पुण्याः समस्ताः क्रियाः ।

वाचः प्राकृतसंस्कृताः श्रुतिशिरो वाराणसी मेदिनीसर्वावस्थितिरस्य वस्तुविषया दृष्टे परे ब्रह्मणि ॥३॥

                                                                                                                ज्या साधकाचे मन एखादा क्षण जरी ब्रह्मचिंतनात अतिशय एकाग्रतेने तन्मय झाले, तर त्याने सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्यासारखेच आहे. पृथ्वीदानाचे पुण्य, सहस्रयज्ञांचे फल आणि सर्व देवीदेवतांच्या पूजेचे श्रेयत्याला मिळते. त्याच्या पितरांचा उद्धार होऊन तो त्रैलोक्यात पूज्य होतो. ज्याचे चित्त परब्रह्माच्या ठिकाणी लीन होते, अशा पुण्यात्म्याचे कुल पवित्र आहे, त्याची माता कृतार्थ आहे. ज्या सुखाला पारावारच नाही, अशा अपरंपार सुखाचा अथांग सागर असलेल्या आत्मज्ञानात तो विहार करीत असल्यामुळे अवघी पृथ्वीमाता पुण्यवती झाली आहे. अशा आत्मज्ञानसंपन्न थोर पुरुषाला संपूर्ण जग नंदनवन, सर्व वृक्ष कल्पवृक्ष तर पृथ्वीवरील सर्व जलाशय गंगोदकच वाटतात. त्याच्या हातून ज्या ज्या क्रिया घडतात, त्या सर्व पुण्यकारकच असतात, तो जे काही बोलतो संस्कृत अथवा प्राकृत, ती परमपवित्र अशी अपौरुषेय वेदवाणीच असेल, संपूर्ण पृथ्वीच पुण्यशील काशीक्षेत्रच बनेल, त्याची कोणतीही स्थिती ही ब्रह्मसमाधीच असेल.कारण आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर तो सृष्टीतल्या सर्व व्यवहाराकडे परमेश्वरी लीला म्हणूनच पाहत असतो.

                                                                                                               आज वैशाख शुद्ध पंचमी! आद्य श्री शंकराचार्य जयंती निमित्त ही छोटीसी लेखनसेवा श्री शंकराचार्यांच्या चरणी अर्पण!                                                                                                

॥श्रीराम जय राम जय जय राम ॥

© सौ. शिल्पा जितेंद्र शिवभक्त, नाशिक

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love