सिरम इन्स्टिटय़ूटचे आदर पूनावाला यांची आंतरराष्ट्रीय ‘एशियन ऑफ दि इयर पुरस्कारा’साठी निवड

राष्ट्रीय
Spread the love

पुणे–पुण्यातील ‘सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांची आंतरराष्ट्रीय ‘एशियन ऑफ दि इयर पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. कोरोना महामारीविरोधातील लढय़ात दिलेल्या योगदानाबद्दल पूनावाला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सिंगापूरचे आघाडीचे वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, पूनावाला यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील जनतेसाठी अत्यावश्यक तसेच परवडणारी औषधे बनविण्याचा उद्देश उराशी बाळगून 1966 साली डॉ. सायरस पूनावाला यांनी सिरम इन्स्टिटय़ूटची स्थापन केली. त्याची धुरा आता त्यांचे पुत्र आदर पूनावाला हे सांभाळत आहेत. कोरोनाने जगभर थैमान घातले असून, कोविडच्या या साथीत आत्तापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्वांनाच कोरोनावरील लसीची प्रतीक्षा आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व ऍस्ट्राझेनका कंपनीसोबत पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने लस निर्मितीचा करार केला असून, ‘कोविशिल्ड’ ही लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सिरम इन्स्टिटय़ूटला भेट दिली होती. त्या वेळी आदर पूनावाला यांनी सादरीकरण केले होते.

लसनिर्मितीची प्रक्रिया, चाचण्या, त्याचे वितरण यांसह विविध घटकांवर आदर पूनावाला हे मागच्या काही दिवसांपासून सिरमच्या माध्यमातून काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची या पुरस्काराकरिता निवड झाली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *