प्रतीक्षा संपली: कोरोना रुग्णांना संजीवनी ठरणारे ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज‘औषधाचे (2-deoxy-D-glucose drug) पुढच्या आठवड्यात होणार लॉंचिंग

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : कोरोनाने देशात थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस निर्माण झाली असली तरी लसीची उपलब्धता ही मोठी समस्या नागरिकांना भेडसावते आहे. सर्वत्र निराशेचे वातावरण असताना काही दिवसांपूर्वी एक दिलासादायक बातमी आल्याने सर्वांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. ती बातमी होती, कोरोनाबाधित रुग्णांवर  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अँटी-कोविड औषध २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (२-डीजी)ची. हे औषध कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. कोविडवर देशातील ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज‘  (2-deoxy-D-glucose drug) या औषधांचे दहा हजार डोस पुढील आठवड्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी हे औषध उपयोगी असून  ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर औषध उत्पादक भविष्यात या औषधाचे उत्पादन वेगाने करण्यासाठी काम करीत असल्याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांन दिली आहे.

 भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रस्त आहे आणि देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. अशा संकटाच्या वेळी एक वरदान मानले जाणारे हे औषध तयार करण्यात तीन वैज्ञानिकांचा सहभाग होता. यामध्ये डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा हे होते. हे औषध एका पॅकेटमध्ये येते, ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर प्यावे लागते.

संरक्षण मंत्रालयाने या औषधाबद्दल म्हटले होते की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या संख्येने रूग्णांना ऑक्सिजन आणि रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हे औषध जीव वाचवण्यासाठी बहुमोल असणार आहे. कारण ते संक्रमित पेशींवर कार्य करते. हे कोरोनाबाधिताचा हॉस्पिटलायझेशन कालावधी कमी करते.

कसे करते 2-डीजी काम?

कोरोनाच्या गंभीर रूग्णांसाठी हे औषध एखाद्या संजीवनीसारखे असणार आहे.  2-डीजीच्या साईड इफेक्टबाबत डॉक्टर सांगतात की, सामान्य पेशींचे मेटाबोलिजम ( अन्नाला उर्जेत परावर्तित करण्याची प्रक्रिया) संक्रमित पेशींपेक्षा एकदम वेगळे असते. औषधाची मात्रा सामान्य पेशींपर्यंत कमीच जाते आणि त्यांचे कोणतेही नुकसान होत नाही.

डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनुसार, 2-डीजी कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनशी लढण्यासाठी सक्षम आहे. या औषधाचे मेकॅनिझम व्हायरसच्या प्रोटीनऐवजी मानवी पेशींच्याच प्रोटीनमध्ये बदल करते,ज्यामुळे व्हायरसला पेशींच्या आत शिरकाव करता येत नाही. इतर अँटीव्हायरस औषधे व्हायरसच्याच प्रोटीनवर वार करतात आणि जेव्हा व्हायरसमध्ये म्युटेशन होते तेव्हा औषधे मोठ्या प्रमाणात निष्प्रभ होतात. हैद्राबाद येथील डॉ. रेड्डी लॅबद्वारे 2-डीजी वर करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलचे प्रमुख शास्त्रज्ञ असलेले आयएनएमएसचे डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. सुधीर चंदना यांनी , तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये हे औषध अनेक व्हेरियंटवर प्रभावी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

मुलांनाही देता येणार

डॉ. भट्ट यांच्या म्हणण्यानुसार, डीजीसीआयने औषधाचा नियमित वापर करण्यास मान्यता मिळताच मुलांनाही या औषधाचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाऊ शकते. या औषधाची वैज्ञानिक चाचणी 18 वर्षांवरील लोकांवर जरी केली गेली असली तरी हे औषध मुलांसाठी हानिकारक नाही. मुलांनाही हे औषध देता येईल असे भट्ट यांनी महटले आहे.

तरूण आणि वृद्धांवर देखील तितकेच प्रभावी

डॉ. अनंत भट्ट यांच्या म्हणण्यानुसार, कोविड मेडिसिन तरुणांप्रमाणेच वृद्धांनाही दिलासा देईल.  कोरोना संसर्गग्रस्तांना हेऔषध देण्यात आले होते, त्यापैकी 42% लोकांना तीन ते चार दिवसांत आराम मिळाला. यात तरूण, वृद्ध रुग्णांचा समावेश होता.  हे औषध घेतल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची त्यांची समस्येपासून सुटका तर झालीच परंतु त्यांचा ताप आणि खोकलाही कमी झाला.

.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *