पुणे(प्रतिनिधि)- वाढीव दराने खते व बियाणे विकणार्या विक्रेते, डीलर व सहभागी अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केली.
स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यानंतर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तरपणे भूमिका मांडली.
संभाजीराजे म्हणाले, काही ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण करून कृत्रिम टंचाई केली जाते अशी माहिती देखील आम्हाला मिळाली आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केला. ₹२६६/- रुपयांना मिळणारी गोणी तब्बल ₹८००/- रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली आहे. या बाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील घटनेबाबत चे व्हिडिओ चित्रिकरण केलेले आहे. तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळालेले आहे.
ही घटना अतिशय धक्कादायक आहे. एमआरप पेक्षा जवळपास तिप्पट दराने विक्री होत असल्याची घटना अतिशय गंभीर आहे. मागील महिन्यातच स्वराज्यच्या वतीने राज्याच्या कृषी आयुक्तांना अधिकच्या दराने होत असलेल्या विक्री तसेच बोगस खते व बियाणे या बाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या बाबत निवेदन सादर केले होते. काही कारणास्तव या नंतर २ दिवसातच कृषी आयुक्तांची बदली झाली. सद्य स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाही ही अतिशय धक्कादायक बाब आहे. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांची लूट सुरू असून राज्यकर्त्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे, ग्रामीण भागातील गरीब जनतेकडे लक्ष दिसून नाही.कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक व्हॉट्सअँप नंबर प्रकशित केलेला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरू असताना कृषिमंत्र्यांनी ग्राउंड वर येऊन काम करणे अपेक्षित असताना, हे कृषी मंत्री व्हाटसअप नंबर आणि फेसबुकद्वारे ऑनलाइन तक्रारी मागवत आहेत. हे अपेक्षित नाही. कृषी मंत्र्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करणे आवश्यक आहे. राज्यभरात शेतकऱ्यांना अशाप्रकारे लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढत आहे का? असा सवाल त्यांनी केला.
मनोज जरांगे आणि सरकारने एकत्र बसावे
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण बाबत विचारले असता ते म्हणाले की,माझ्या पणजोबांनी पहिले आरक्षण कोल्हापूर संस्थानात दिले होत.त्यावेळी ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानंतर देशभरात ते आरक्षण लागू झाले. गरीब मराठा समाजातील नागरिकांना आरक्षण मिळव, यासाठी मी २००७ आणि २००९ या वर्षी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असल्याच त्यांनी सांगितले.
गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा,यासाठी मनोज जरांगे हे लढा देत आहेत आणि आजवर त्यांनी भूमिका मांडली आहे.तसेच मनोज जरांगे आणि सरकारचे नवी मुंबईमध्ये काय बोलणं झालं.त्यांना काय शब्द दिला.हे त्या दोघांना माहिती आहे. याबाबत मला काही माहिती नाही.पण आता हा विषय अधिक चिघळण्यापेक्षा मनोज जरांगे आणि सरकारने एकत्र बसावे,जेणेकरून गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा,अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.