पुणे(प्रतिनिधि)–काँग्रेस पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत बाहेरून आलेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात बंड पुकारणाऱ्या पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचे बंड थंड झाले आहे. धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध करणारे आबा बागूल आता रवींद्र धंगेकर हेच निवडणूक जिंकणार, असं म्हणत आहेत त्यामुळे आबा बागुलांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरू झाली आहे.
रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात बागुल यांनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे मेणबत्ती लावून प्रतिकात्मक आंदोलन केले होते. यावेळी बागुल यांनी काँग्रेस पक्षात निष्ठेची हत्या झाली आहे, असे शब्द लिहिलेला शर्टही घातला होता. तसेच काँग्रेस पक्षात सातत्याने निष्ठावंत कार्यकर्ते-नेत्यांवर अन्याय करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत आयाराम-गयाराम लोकांना संधी दिली जात आहे. यामुळे पक्षाशी निष्ठावंत राहिलेला कार्यकर्ता भरडला जात आहे. याची दखल पक्षाच्या हायकमांडने घ्यावी अशी मागणी देखील बागुल यांनी केली होती.
यानंतर बागुल यांनी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारापासून लांब राहत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली होती. यानंतर बागुल हे भाजपामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्याने बागुल यांचा भाजप प्रवेश झाला नसल्याच्या देखील चर्चा दरम्यानच्या काळात पाहायला मिळाल्या. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बागुल यांची भेट घेतली होती. मात्र त्यांना बागुल यांची नाराजी दूर करण्यात अपयश आल्याचं बोललं जात होतं.
त्यानंतर बागुल यांनी नाना पटोले यांची काल भेट घेतली. त्या भेटीनंतर आज आबा बागुल यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच रवींद्र धंगेकर हे पुण्यातून बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाना पटोले यांनी पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस आपल्याकडे ठेवेल असा विश्वास दिला असल्याचं बागुल यांनी यावेळी सांगितलं. आधीच्या तीन निवडणुका हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात असून त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघावरती काँग्रेसने अधिकार सांगावा आणि उमेदवार द्यावा, अशी मागणी आपण पटोला यांच्याकडे केले असून त्यांनी ती मागणी मान्य केली असल्याचं बागुल यांनी सांगितलं.