पुणे(प्रतिनिधी)–पुणे शहरातील फुरसुंगी भागात पॉवर हाऊसजवळ टँकरने पाणी पोहचविणाऱ्या एका टँकरमध्ये महिलेचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण (वय-२५,रा.हांडेवाडी,पुणे) असे मृतदेह मिळालेल्या माहिलेचे नाव असून ती बेपत्ता असल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात टँकर चालक पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (रा.हांडेवाडी,पुणे) यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कौशल्या चव्हाण व तक्रारदार पुरुषोत्तम ससाणे हे हांडेवाडी परिसरात दुगड चाळ याठिकाणी रहाण्यास आहे. बुधवारी दिवसभर शहराच्या विविध भागात ससाणे यांनी टँकरने पाणीपुरवठा केला होता. त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले व घराजवळ त्यांनी टँकर लावला. गुरुवारी सकाळी (एमएच १२ डब्ल्यू जे १०९१ ) हा टँकर त्यांनी बाहेर काढून रामटेकडी येथे टँकर मध्ये पाणी देखील भरले. टँकर घेऊन ते फुरसुंगी येथील पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका घरी पाणी पोहचविण्यास गेले. त्यांनी पाणी टँकर मधून सुरु केले परंतु टँकर मधून पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पाण्याचा व्हाॅलव्ह तपासून पाईप बाहेर काढून पाहिला असता त्यांना टँकर मधून साडी बाहेर आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी साडी नेमकी कोठुन टँकर मध्ये आली हे पाहण्यासाठी टँकरचे झाकण उघडून आत डोकावून पाहिले असता त्यांना टँकर मध्ये कौशल्या चव्हाण हिचा मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ, हडपसर पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह पाण्याचे टँकर मधून बाहेर काढून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. नेमका कोणत्या कारणास्तव हा प्रकार झाला याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या याबाबत आत्ताच सांगता येणार नाही अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मांढरे यांनी दिली.