पुणे- महाराष्ट्रातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल सोमवारी लागला. निकाल लागल्यानंतर कुठल्या राजकीय पक्षाने बाजी मारली, कुठल्या प्रस्थापितांना धक्का बसला अशा आशयाच्या बातम्या सोशल मिडीया आणि माध्यमांमध्ये झळकल्या परंतु, पुणे जिल्ह्यात एका गावच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीची बातमी आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा झाला आहे.
एरवी अनेकवेळा निवडून आलेल्या सदस्यांची मिरवणूक गावातून काढली जाते. त्यावेळी निवडून आलेल्या उमेदवाराचे चाहते त्याला खांद्यावर उचलून घेतात,ही नेहेमीची बाब असते. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू या गावात मात्र, सोमवारी निवडून आलेल्या सदस्याच्या पत्नीनेच आपल्या पतीला खांद्यावर घेत गावभर त्याची मिरवणूक काढल्याची घटना ही सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आणि त्याचा व्हिडीओ आणि बातमी सोशल मिडीयावार व्हायरल झाली.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू या गावात जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलला सातपैकी 6 जागांवर विजय संपादित केला. या विजयामध्ये या गावातील महिलांचा मोठा वाटा होता. यामध्ये गावातील संतोष शंकर गुरव यांनी 221 मिळवत विरोधातल्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे गुरव यांच्या पात्नीला आपले पती चांगल्या मताधिक्क्याने निवडून आल्याने तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्या आनंदाच्या भरात तिने पतीला खांद्यावर उचलून घेत गावभर मिरवणूक काढली. पत्नीच्या या खमकेपणा हाही चर्चेचा विषय ठरला .