पुणेः- लोकांमध्ये संदर्भहीन माहिती वारंवार प्रसारीत करून भ्रम निर्माण करून स्वतःचे इप्सित साधून घ्यायचे, या डाव्यांच्या कुटील डावाने भारतच नव्हे, तर संपूर्ण जग त्रासलेले आहे. या विचारांच्या उत्तरक्रीयेची जबाबदारी आणि कर्तव्य आपल्यालाच निभवावे लागेल. डाव्यांचे युद्ध परतवून लावण्यासाठी एकत्रित योगदानाची गरज आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) यांनी व्यक्त केले. (A collective contribution is needed to reverse the Left’s war)
येथील दिलीपराज प्रकाशनातर्फे (Dilipraj Prakashan) प्रकाशित आणि अभिजित जोग लिखित ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित, लेखक अभिजित जोग (Abhijit Jog) आणि दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे (Rajiv Barve) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, मंत्र लोकशाहीचा, पण ही छुपी झुंडशाही आहे. मानवतेचा जप करायचा आणि इतिहासाची पाने उलटल्यास सगळ्यात जास्त कत्तली यांच्याच काळात झाल्या आहेत. हे डाव्या विचारसरणीचे दांभिक दर्शन आहे. हा भ्रमाचा भोपळा आणि ही दांभिकता मोडून काढण्यासाठी सर्वांना हा लढा लढावा लागेल. भ्रमाचा हा पडदा आपल्याला फाडावा लागेल. त्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावेच लागेल. डाव्यांच्या या शुद्र अंतःकरण आणि शुद्र हेतूमुळे सगळे जग त्रासले आहे. डाव्यांचे हे संकट खोलवर रूजले आहे. मागील पिढ्यांपासून आपल्या पिढ्यांपर्यंत काहीही न करता आपल्यावर झालेले संस्कार केवळ आपल्या नाकर्तेपणामुळे आपण पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकलो नाही. जे जे मांगल्य आहे, ते ते अमंगस करून सोडायचे आणि जे कोणी याला विरोध करेल त्यास ‘कॅन्सल पॉलिसी’ अवलंबून त्याचे अस्तित्वच पुसण्याचा प्रयत्न केले जातात. परंतु, आपले अस्तित्व पुसले जाईल या भितीपोटी सज्जन लोकांनी शांत न बसता नव्या पिढीचे प्रबोधन केले पाहिजे. शाश्वत मूल्यांच्या आधारावर पुन्हा एकदा आपल्याला उभे रहावे लागेल. प्रतिकार आणि प्रबोधनाव्दारे पुन्हा एकदा मूळांकडे जाण्याची आवश्यकता आहे.
प्रा. शांतिश्री पंडित म्हणाल्या की, डाव्यांनी त्यांची इको-सिस्टीम निर्माण केली असून संघ विचारच या इको-सिस्टिमला धारातीर्थी पाडू शकेल. आपण आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगला पाहिजे. आपण हिंदू आहोत आणि एका उज्ज्वल परंपरेचे पाईक आणि वारसदार आहोत, याचा गर्व बाळगला पाहिजे.
अभिजित जोग यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मधुमिता बर्वे यांनी आभार मानले. मृणाल धोंगडे यांनी वंदे मातरम् सादर केले.