पुणे : आम्ही व्यसन करणार नाही आणि इतरांनाही करु देणार नाही, अशी शपथ घेत दारु, गुटखा, चरस, सिगारेट, गांजा अशा व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करण्यात आले. व्यसनाधिनतेकडे वळणा-या तरुणाईला त्यापासून परावृत्त करण्यास प्रयत्न करु, असा निर्धार करीत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. व्यसनमुक्त युवा… व्यसनमुक्त भारताचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला.
जाधवर ग्रुप च्या इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग व डॉ.सुधाकरराव जाधवर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल यांच्यातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन व शपथ कार्यक्रमाचे आयोजन न-हे येथील संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंगच्या शितल निकम, अनुश्री पारधी, श्वेता कुंभार उपस्थित होते. महाविद्यालयातील नर्सिंगच्या विद्यार्थीनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, व्यसनांच्या विळख्यात अडकणा-या मुलांच्या संख्येइतकेच मुलींचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यसनांपासून सर्वांनी परावृत्त व्हावे, याकरीता आम्ही नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. नर्सिंगच्या माध्यमातून पुढे या महाविद्यालयातील विद्यार्थीनी रुग्णसेवा करतात. परंतु व्यसनापासून दूर राहिल्यास आरोग्य खराब होणार नाही, हे तरुणाईला समजावे, याकरीता असे उपक्रम राबविले जातात. व्यसनमुक्त युवा…व्यसनमुक्त भारत हे ब्रीद अंगिकारुन व्यसनमुक्तीचा संदेश सर्वत्र देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.