विजया एकादशी हा दिवस आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्मदिवस.
तशा अर्थाने महापुरूष असूनही राजकीय वा समाज सुधारक असे बिरूद नसल्यामुळे सामान्य भारतीयांना ते पुरेसे परिचित नाहीत वा काहींना चुकीचे परिचित वा विचित्र चष्म्यातून परिचित आहेत.म्हणून, आज श्री गुरूजी या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून घेऊ.
मला काही समजायच्या वयापूर्वीच श्री गुरूजींचे निधन झाले. त्यामुळे एकदा आमच्या शाखेला भेट दिली, एकदा संघ शिक्षा वर्गात त्यांच्या व्यवस्थेत होतो व एका प्रकट बौद्धिक वर्गाला उपस्थित होतो एवढेच मला श्री गुरूजींचे प्रत्यक्ष दर्शन झाले. पण त्यांनी मार्गदर्शन केलेल्या संघटनेतून प्रवास केल्यामुळे आज श्री गुरूजी हे व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
श्री गुरूजींचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे सर्वात अवघड आहे. कारण, एका वेगळ्या स्तरावरील संपूर्ण विरोधाभासाने भरलेले वैयक्तिक जीवन, ते अतिशय सहजपणे जगले. मोक्षाच्या वाटेवरून चाललेला आणि शरीरापासून मुक्त असा हाआध्यात्मिक साधक भौतिक जगाच्या गराड्यात निवांत वावरत होता. ते साधना करीत आहेत म्हणून लोकांना ताटकळत ठेवलेले त्यांना कधीही कोणी पाहिलेलं नाही, पारलौकिक जगाबद्दल बोलताना ऐकलेलं नाही. देश, संस्कृती, धर्म, भारताचे चिरंतनत्व, वैश्विक जबाबदारी, संघ कार्य व कार्यकर्ता एवढेच विषय व त्याचे स्पष्टीकरण ते मांडत. या एका गोष्टीसाठी सुद्धा ते महान ठरतात.
सामान्यपणे माहित असलेल्या श्री गुरूजींच्या गुणांशिवाय काही गोष्टी समजावून घेणे गरजेचे आहे. श्री गुरूजी १९४० ला सरसंघचालक झाले. १९४५ पासून फाळणीचे वारे वाहू लागले. १९४७ साली फाळणी झाली. या वेळचा संघ समजावून घेऊया.
संघात फक्त तरूण होते व फाळणी म्हणजे संघाचा मैदानावरील पराभव होता. तरूण संघ कार्यकर्ते किती संतप्त व वैफल्यग्रस्त झाले असतील, नव्हे होते. अशा वैफल्यग्रस्त कार्यकर्त्यांची फळी आणि विरूद्ध बाजूला राजकीय विद्वेषाने चालणारी सत्ता, विकृत विचारधारेनेग्रस्त वैचारिक क्षेत्र अशा सर्व अडचणींतून मार्ग काढून प्रवास करायचा होता या तरुण नेतृत्वाला. पराभूत मानसिकतेतील संघटनेला सुखरूप ध्येय पथावर मार्गक्रमित ठेवणे अशक्य असते, ते श्री गुरूजींनी यशस्वी करून दाखवले हे त्यांचे महानपण आहे. इतर कोणाही नेत्याला हे शक्य झाले नसते. परंतू, ‘मी’पण संपवलेल्या श्री गुरूजींना हे शक्य झाले. समोर संपूर्ण अंधार असताना स्वतःच ध्येयज्योत बनून श्री गुरूजींनी मार्गक्रमणा केली व कार्यकर्त्यांना पथदर्शन केले व उत्साहित सुद्धा! एखाद्या संघटनेच्या प्रमुखाला ध्येयाबाबत किती कठोर असावे लागते व व्यक्तिगत जीवनात किती नि:संग रहावे लागते याचे सर्वोच्च उदाहरण श्री गुरूजी यांनी स्वतःच्या आचरणातून घालून दिले. सामान्य कार्यकर्त्याला गोवधबंदी स्वाक्षरी आंदोलन दिले. वैफल्यग्रस्त मानसिकतेतून सामान्य स्वयंसेवकांना बाहेर काढले.
कम्युनिझमचा वैचारिक दरारा पूर्ण विश्वावर स्वार होता. त्यावेळी राष्ट्र, संस्कृती, संस्कार, धर्म या संकल्पना समाजात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांना वैचारिक बळ देण्याची अवघड जबाबदारी श्री गुरूजींवर येऊन पडली होती. त्यावेळीसर्वप्रथमत्यांनी,‘कम्युनिझम हा स्वतःच्या वैचारिक विरोधाभासाने नष्ट होणार आहे’ हे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले व या वैचारिक लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या मूलभूत चिंतनाची ताकद आज सर्व जग पहात आहे.
धर्म हे भारतीयतेचे मर्म आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याहून योग्य व्यक्ती संघ कार्यपद्धतीला सापडणे शक्य नव्हते. त्यामुळे श्री गुरूजी हे असे संघटन प्रमुख होते, ज्यांना स्वतःलाच याची जाणीव होती की आपल्या संघटनेसाठी फक्त आपणच एक विशिष्ट योगदान देऊ शकतो आणि ते आपण दिलेच पाहिजे. म्हणूनच, संघाच्या भविष्यातील प्रवासासाठी, समाज आंदोलनांसाठी सामान्य समाज ज्या साधू-संताना मानतो त्यांना आपल्या या संघटनेसोबत उभे केले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रातील स्वतः चेअधिकार वापरून विश्व हिंदू परिषद स्थापन केली. संघटनेसाठी तिच्या प्रमुखाने केलेले हे सर्वात अभुतपूर्व योगदान होते. देशातील सर्व क्षेत्रे घुसळून टाकणारे रामजन्मभूमी आंदोलन हे या संघटनेने अंगीकृत केले व सर्व साधू-संत हिरारीने कामाला लागले.
आध्यात्मिक क्षेत्रात श्री गुरूजींचा अधिकार फार मोठा होता. एकदा श्री गुरूजी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्रीमत् चंद्रशेखर सरस्वती यांना अचानक भेटायला गेले व तडक त्यांच्या कक्षात पोहोचले व थोड्या वेळाने निघून गेले. श्रीमत् चंद्रशेखर सरस्वती हे त्यावेळी पूजेच्या तयारीत होते आणि पूजा मोडली म्हणून त्यांच्या शिष्यांनी पुन्हा स्नानाची रचना सुरू केली. पण शंकराचार्यांनी सांगितले,“अरे, पूजा मोडली नाही तर पूर्ण झाली”. हा अधिकारसुद्धा संघटनेसाठी त्यांनी वापरला होता, असे होते श्री गुरूजी!
आपला स्वभाव बदलून, निरासक्तपण सोडून संघटनेसाठी ते भौतिक आयुष्य जगले.सामान्य माणसाला संघटित करण्यासाठी स्वतःकडे देवत्व येईल अशी कोणतीही कृती त्यांनी केली नाही.संघटना प्रमुख हा ध्येयवाद शिकवण्यासाठी असतो, ते त्यांनी अत्यंत कौशल्याने केले. संकटकाळी संघटन संयमाने नियंत्रित करायचे असते, हे त्यांनी गांधी हत्या प्रकरणी सिद्ध केले. ‘Be calm at all cost’हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य व त्याला अनुरूप वर्तन त्यांनी करून दाखवले व फक्त तेच करू शकणार होते ती गोष्ट त्यांनी संघटनेसाठी केली ती म्हणजे देशातील यच्चयावत सांधु, संत व विविध पंथ प्रमुख यांचे व्यासपीठ उभे केले.
संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांना जे अपेक्षिले होते त्याहून ओंजळभर अधिक देऊन श्री गुरुजींनी हा इहलोक प्रवास संपविला.
मला वेगळे वाटलेले श्री गुरूजी असे होते. आजही संघटनेसाठी, समाजासाठी, देशासाठी व जगासाठी त्यांच्याअसामान्य कार्याचे स्मरण आणि चिंतन झाले पाहिजे.
– सुनील देशपांडे