पुणे—राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी करत मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ‘तूतू…मैमै’ सुरू झाले आहे. शरद पवार यांनी स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांना मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पाटील म्हणाले, शरद पवार यांच्याबद्दल आक्षेप नाही, मात्र पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात? पुणे पिंपरीतल्या आमदार-खासदाराला न कळवता, माननीय शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली. पवारांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. ते राज्यसभा सदस्यही आहेत. पण अशा प्रकारे घाईत ट्रायल घेण्याचं काय कारण? यातून श्रेयवादाची लढाई चाललीय का? ‘
11 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. कंपनीला गॅरेंटी आणि इतर असा केंद्र सरकारने 8 हजार कोटी रुपयांचा वाटा त्यात उचलला आहे. 3 हजार कोटी रुपये महापालिकेने दिले. राज्य सरकारचा काही वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. कोविड परिस्थितीमुळे उशीरा कार्यक्रम घेऊ, असे ठरले होते. पण शरद पवार यांना ट्रायल घेण्याची एवढी घाई कशासाठी झाली?
आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम
दरम्यान, मेट्रोचे आम्ही उद्घाटन केले नाही तर ट्रायल घेतली, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ट्रायल घेतली तरी त्यासाठी फक्त पवारच का केले? पुण्यात आठ आमदार आहे. दोन राष्ट्रवादीचे, सहा भाजपचे आमदार आहेत. खासदार बीजेपीचे आहेत. राज्यसभा सभासद प्रकाश जावडेकर बीजेपीचे आहेत. पिंपरी चिंचवडला शिवसेनेचे खासदार, एक राष्ट्रवादीचे एक भाजपचे आमदार आहेत. पण हे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला समजत नाही का? तुमच्याकडे महाराष्ट्र राज्य होते, तेव्हा तुमच्या काळात तुम्ही हा प्रकल्प का नाही पूर्ण केला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळवणं, कर्जासाठीचे करार करणं, केंद्र सरकार, राज्य सरकारांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला.
कंपनीविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करा
चंद्रकांत पाटील यांनी सर्व आमदार आणि खासदारांना या वेळी आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘ही आमदार-खासदारांच्या हक्कांवर गदा आली आहे. प्रशासकीय ट्रायल असेल तर ही पवारसाहेब कशाला पाहिजेत? त्यांनी फिरायचं, फोटो काढायचे. महाविकास आघाडीच्या काळात उलट हा प्रकल्प लांबला. मुंबईतला प्रकल्प बारगळलाच. त्यामुळे पवारांना दोष नाही. पण मेट्रो कंपनीवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार. सर्व आमदार-खासदारांनाही माझं आवाहन आहे, तुम्हीही कंपनीविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करा. ‘