पुणे- सामाजिक नैतिकतेचा आधार घेत असताना आजवर अनेकदा वर्चस्ववादी घटकांकडून कमकुवत घटकावर अन्याय झाल्याची उदाहरणे आहेत. त्यातूनच सती प्रथा, लिंग भेद, बालविवाह यांसारखे प्रकार घडले. संविधान आणि सांविधानिक नैतिकतेत प्रत्येक घटकाचा विचार करत त्याला न्याय दिला आहे. सध्याच्या अनेक न्यायालयीन निर्णयांमध्ये याची उदाहरणे सापडतील, असे मत माजी सनदी अधिकारी व बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधानातील नैतिकता आणि भारतीय लोकशाही’ विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संविधान दिवसानिमित्त संविधान स्तंभासमोर उपस्थितांनी प्रस्ताविकेचे वाचन केली.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, संविधान जोपर्यंत आचरणात आणत नाही तोपर्यंत लोकशाही मूल्यांची रुजवन होणार नाही. संविधानाचा पाया हेच त्याचे नैतिक मूल्य आहेत. अनेक न्यायालयीन प्रकरणांमध्ये संविधानाच्या नैतिक मूल्यांचा आधार घेत निकाल जाहीर केले गेले आहेत. ज्यामुळे चुकीच्या प्रथांना आळा बसला असून लोकशाही अधिक सक्षम करण्यास मदत झाली आहे.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही संविधानाचा अभ्यास उपलब्ध करून दिला आहे. संविधान दिवस हा एका दिवसापूरता न राहता जीवनात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
डॉ.मनोहर जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.