पुणे- पुणे शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासह ग्रीन सिटी अर्थात हरित पुण्यासाठी विद्युत परिवहनने पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून बेंगळूरमधील ईव्ही उत्पादक अल्टीग्रीनच्या सहय़ोगाने लास्ट-माइल डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आली आहे.
यासंदर्भात बोलताना विद्युत परिवहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मित्रा म्हणाले, पुण्याला हरित बनविणे आणि येथील रस्ते भविष्यासाठी विशेषतः व्यावसायिक ईव्हीकरिता तयार करणे, हा आमचा उद्देश आहे. या माध्यमातून विद्युत वाहनांसह आंतरशहरी माल वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटीची संधी व लाभ जाणून घेत विद्युत परिवहनच्या वतीने वाघोलीमध्ये ४० वेईकल चार्जिंग व पार्किंग केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धार्थ मित्रा यांनी यावेळी दिली. पहिल्या टप्प्यात कंपनी २० व्यावसायिक ईव्हींसह सुरूवात करणार असून लवकरच ही संख्या 100 पर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अल्टीग्रीन शहरातील वाहतूकीमध्ये ५५० किग्रॅ भार क्षमतेसह दिवसाला १२० किमी अंतर पार करेल असे त्यांनी सांगितले.
ई-कॉमर्स, फळे, पालेभाज्या, औषधे, रिटेल असे उच्च आकारमान, कमी दर्जा असलेले विभाग उदयास येत असल्यामुळे आंतरशहरी व्यावसायिक परिवहनामध्ये तीनचाकी व चारचाकी विभागांमधील डिझेल पर्यायांऐवजी शुद्ध, कार्यक्षम, विश्वसनीय व कमी खर्चिक ई व्हेईकलसाठी मागणी वाढत असल्याचे अल्टीग्रीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ सरन यांनी सांगितले.
2030 पर्यंत 30 टक्के इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर
उपक्षेत्रीय परिवहन अधिकारी संजय भोर म्हणाले, 2030 पर्यंत 30 टक्के इलेक्ट्रिक गाडय़ा रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी बेस्ट, पीएमपीसह अन्य पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवांमध्येही इलेक्ट्रिक गाडय़ांवर भर दिला जाणार आहे.