पुणे- पुण्यातली ससून रुग्णालयात एका महिलेने नर्सच्या वेशात येऊन तीन महिन्याच्या चिमुकलीला पळवून नेल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर रुग्णालयात गोंधळ उडाला. नर्सच्या वेशात आलेल्या एका महिलेने तिच्या पतीच्या मदतीने बाळाला पळवंल होते. पोलिसांनी तिच्यासह तिच्या पतीला अटक केली आहे. मूल होत नसल्याने त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
26 वर्षीय एक महिला आपल्या पतीसोबत नर्स ड्रेस करुन ससून रुग्णालयात घुसली. त्याठिकाणी या महिलेने संधी साधून एका तीन महिन्याच्या बाळाला वॉर्डातून पळवले. दरम्यान, बाळाच्या आईला आपले बाळ गायब असल्याचे पाहून तिने हंबरडा फोडला आणि हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.
कोणाला काय झाले ते समजत नव्हते. मात्र, काही वेळात तिचे बाळ चोरल्याचे समजले आणि रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. बाळ चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात तणाव निर्माण झाला. बाळी चोरीची त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच नर्सच्या वेशात आलेल्या महिलेला आणि तिच्या पतीला अटक केली.
दरम्यान, आरोपी महिलेला मुल होत नसल्याने तिने बाळाला पळवलं असल्याचं संबंधित आरोपीने सांगितलं आहे. बाळाची आई गेल्या काही महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचारासाठी येत होती. तिचं बाळ 3 महिन्यांचं आहे. मात्र झालेल्या प्रकारामुळे आता ससून रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.