पुणे- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळात, सहज आणि बिनचूक डिजिटल सातबारा देऊन प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याची जबाबदारी राज्याच्या महसूल विभागाची आहे. त्यादृष्टीने महसूल विभागाने नागरिकांसाठी नवीन डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, ऑनलाइन फेरफार प्रणाली आणि ’आठ अ’ ही सेवा संपूर्ण राज्यात सुरू केली असून भविष्यात तंत्रज्ञानाचा अवलंब करून आणखी सुरळीत सेवा देण्यास कटिबद्ध राहू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
तसेच आहे त्या ठिकाणी सहज प्राप्त होणारा कोरोनाच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाइन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाइन सुविधांचा प्रारंभ रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार संग्राम थोपटे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याचबरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. आजपासून नागरिकांना नवीन स्वरूपात सातबारा करून देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्यावतीने सातबारासोबत फेरफार संगणकीकृत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिक चांगले काम करून नागरिकांना जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे, असे थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण पिकांच्या नोंदी शेतकर्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहेत. ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, असे थोरात म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणारे ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचार्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.