पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-1)


महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण-घडण करण्याचे कार्य प्रमुख पाच भक्ती संप्रदायांनी केले. नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय हे पाच प्रमुख संप्रदाय होते. या संप्रदायाच्या प्रेरणेतूनच मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाड्मयाची निर्मिती झाली. या प्रत्येक संप्रदायाचा प्रभाव कमी -अधिक प्रमाणात समाज मनावर झाल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृती व वाड्मय विश्वाचे भरण- पोषण करणारा प्रमुख संप्रदाय म्हणून नाथ संप्रदाय ओळखला जातो तर सकृतदर्शनी अवैदिक वाटला तरी गीता,भागवत, श्रीकृष्ण आणि दत्त यांना पूजास्थानी मानणारा संप्रदाय म्हणून महानुभाव संप्रदाय ओळखला जातो, वैदिक परंपरेतील अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर स्थित असणारा उपासना मार्ग म्हणून ओळखला जाणारा संप्रदाय म्हणून दत्त संप्रदाय ओळखला जातो, समाजाच्या अज्ञानातून निर्माण झालेले जडमूढतेचे हीण भस्मसात करून टाकण्यासाठी सर्व गुणांचा आदर्श अशा पुरुषार्थी प्रभूरामचंद्रासारख्या दैवताच्या उपासनेचा पुरस्कार करणारा संप्रदाय म्हणून समर्थ संप्रदाय ओळखला जातो तर समाजातील परस्परविरोधी आणि विपरीत अशा वृत्तींना भक्ती सारख्या उदात्त व सर्वस्पर्शी लाटेत सामावून घेत सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे ही भावना रुजविणारा म्हणून वारकरी संप्रदाय ओळखला जातो.

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-6)

महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय या पाच संप्रदायांनी आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही वारकरी संप्रदाय वगळता अन्य चार संप्रदायांना मर्यादित यश लाभल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाला स्थान न देता सहज-सोप्या भक्तीच्या मार्गाने समाजमनाचे भरण-पोषण करणाऱ्या वारकरी संप्रदायाला समाजाने स्वीकारले. वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्या कीर्तन – प्रवचनातून, वाड्मयातून व आपल्या आचार – विचारातुन समतेचा संदेश दिला. समाजातील भेद दूर केले व अठरापगड जातींमध्ये चैतन्य निर्माण केले. वेगवेगळ्या उपासना पद्धतीला फाटा देऊन नामस्मरणाच्या माध्यमातून सहज – सुलभ भक्ती करण्याची शिकवण वारकरी संप्रदायाने समाजाला दिली. आजपर्यंत कर्मकांडात अडकलेला धर्म व संस्कृत भाषेत अडकलेले धर्माचे तत्वज्ञान संतांनी मुक्त केले. आचरण्यास सहज-सोपा असणारा आचारधर्म सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाला लोकांनी मनापासून स्वीकारले, त्यामुळेच मध्ययुगीन कालखंडापासून हा संप्रदाय वाढतच गेला. आज आठशे ते हजार वर्षांनंतरही आधुनिक काळातही तो वाढतानाच दिसतो आहे. (क्रमशः

अधिक वाचा  'मी पुन्हा येईन' असे म्हणण्यात घमेंड नाही तर आत्मविश्वास --नारायण राणे

 -डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मो. क्र. ७५८८२१६५२६.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love